March 23, 2026

unfilteredtruth

unfilteredtruth

टोप येथे पहाटे ट्रक पलटी; पुणे-बंगळुरू महामार्गावर वाहतूक ठप्प…

Kolhapur Highway Accident: हातकणंगले तालुक्यातील टोप येथे पहाटे मालवाहू ट्रक पलटी झाल्याने पुणे-बंगळुरू महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली.

टोप :

हातकणंगले तालुक्यातील टोप येथे मंगळवारी पहाटे एक गंभीर अपघात घडला. पुण्याच्या दिशेने जाणारा मालवाहू ट्रक अचानक टायर फुटल्याने पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर पलटी झाला. या घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णतः विस्कळीत झाली असून दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

MH 09 FL 8425 क्रमांकाचा हा ट्रक टोप येथील हॉटेल मंथनसमोर पलटी झाला. अपघात घडताच काही मिनिटांतच महामार्गावर तीव्र वाहतूक कोंडी निर्माण झाली. पहाटेच्या वेळेत जड व हलक्या वाहनांची संख्या अधिक असल्याने परिस्थिती आणखी बिकट झाली.

या परिसरात टोप ग्रामपंचायत कार्यालयासमोर तसेच कासारवाडी फाट्याजवळ महामार्गाचे काम गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेले आहे. परिणामी, येथे वारंवार वाहतूक कोंडी तसेच छोटे-मोठे अपघात होत असल्याचे चित्र आहे. आजच्या ट्रक अपघातामुळे या समस्येने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे.

घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी शिरोली पोलीस आणि महामार्ग पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पलटी झालेला ट्रक बाजूला करण्यासाठी आणि वाहतूक पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरू असून, मात्र ट्रक हटविण्यास वेळ लागत असल्याने वाहनधारकांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे.

महामार्गावरील रखडलेली कामे, अपुरी वाहतूक सुरक्षा व्यवस्था आणि वारंवार होणारे अपघात यामुळे स्थानिक नागरिक व वाहनचालकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. “महामार्गाचे काम पूर्ण होणार तरी कधी?” असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

Spread the love