
पुणे : टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या (टीएमव्ही) लोकमान्य टिळक लॉ कॉलेजतर्फे आयोजित ‘दक्षिण आशियातील घटनात्मक लोकशाही : नागरी घटनावाद आणि उदयोन्मुख युवा आवाज’ या विषयावरील दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद उत्साहात संपन्न झाली. २३ आणि २४ ऑक्टोबर रोजी आयोजित या परिषदेत घटनात्मक लोकशाही, संवैधानिक संस्थांचे स्वातंत्र्य, निष्पक्षता आणि बंधुता या विषयांवर देश-विदेशातील तज्ज्ञांनी विचारमंथन केले.
परिषदेच्या उद्घाटन सत्रात सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अभय एस. ओक यांनी संवैधानिक संस्थांनी मुक्त, निष्पक्ष आणि स्वतंत्रपणे काम करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. संस्थांच्या कामकाजात त्रुटी आढळल्यास केवळ आंदोलन करण्याऐवजी त्या स्वतंत्रपणे कार्य करू शकतील, अशी सक्षम व्यवस्था निर्माण करण्यावर त्यांनी भर दिला.
महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, मुंबईचे कुलगुरू प्रा. (डॉ.) दिलीप उके यांनी संविधानातील ‘बंधुता’ या मूल्याचे महत्त्व अधोरेखित केले. बंधुतेच्या मूल्याला प्राधान्य दिल्यास घटनात्मक लोकशाहीचे संरक्षण अधिक प्रभावीपणे होऊ शकते, असे त्यांनी नमूद केले.
या परिषदेला नेपाळ इन्स्टिट्यूट फॉर इंटरनॅशनल कोऑपरेशन अँड एंगेजमेंटचे संशोधन संचालक डॉ. प्रमोद जयस्वाल आणि श्रीलंका विधी आयोगाच्या सदस्या व कोलंबो विद्यापीठातील वरिष्ठ विधी प्राध्यापिका जीवा निरेल्ला उपस्थित होत्या.
परिषदेच्या विविध तांत्रिक सत्रांमध्ये चाणक्य मंडल परिवाराचे संस्थापक-संचालक आणि माजी सनदी अधिकारी डॉ. अविनाश धर्माधिकारी, प्रा. जीवा निरेल्ला, डॉ. प्रमोद जयस्वाल आणि सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ वकील अॅड. अनिरुद्ध जोशी यांनी मार्गदर्शन केले. या सत्रांमध्ये घटनात्मक लोकशाहीसमोरील आव्हाने, संस्थात्मक स्वातंत्र्य आणि लोकशाही प्रक्रियेत युवकांची भूमिका यांवर चर्चा करण्यात आली.
या आंतरराष्ट्रीय परिषदेला लॉ कॉलेजमधील विद्यार्थी, प्राध्यापक तसेच कायदे आणि न्याय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. दोन दिवसांच्या चर्चासत्रांमधून घटनात्मक मूल्यांचे महत्त्व आणि लोकशाही संस्थांच्या बळकटीकरणाविषयी विचारांची देवाणघेवाण झाली. या परिषदेसह कार्यक्रमाची यशस्वी सांगता झाली.

More Stories
नागपुरात नगरसेवकाच्या घरावरील गोळीबार प्रकरणात सात आरोपींवर मोक्का…
पिरंगुटमध्ये विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी युवा सेना आक्रमक; पोलीस गस्त वाढवण्याची मागणी…
नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी भाजपची मोर्चेबांधणी; मुख्यमंत्री फडणवीस मैदानात…