March 23, 2026

unfilteredtruth

unfilteredtruth

सुरेश कलमाडींच्या निधनानंतर पुण्यात काँग्रेसची भूमिका चर्चेत; अंत्यसंस्कारावेळी प्रचार सुरूच

पुण्यातील माजी खासदार सुरेश कलमाडी यांच्या निधनानंतर काँग्रेस पक्षाकडून प्रचार स्थगिती न दिल्याने व अंत्यसंस्कारावेळी मर्यादित उपस्थितीमुळे राजकीय चर्चा सुरू.

पुणे :

पुणे शहराच्या राजकारणात काँग्रेसला मजबूत आधार देणारे आणि अनेक दशके पक्षाची धुरा सांभाळणारे माजी खासदार व माजी केंद्रीय राज्यमंत्री सुरेश कलमाडी यांच्या निधनानंतर काँग्रेस पक्षाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. कलमाडी यांच्या निधनाची बातमी समजूनही पुणे महापालिकेच्या निवडणूक प्रचाराला तत्काळ स्थगिती देण्यात न आल्याने राजकीय वर्तुळात तीव्र चर्चा सुरू झाली आहे.

कलमाडी यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार सुरू असताना काँग्रेसचे काही स्थानिक नेते व उमेदवार प्रचारात व्यस्त असल्याचे चित्र दिसून आले. पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरून प्रचार थांबविण्याबाबत स्पष्ट सूचना न आल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याचे बोलले जात आहे.

पुण्यातील काँग्रेस भवनातून जवळपास ३५ वर्षे राजकीय कारभार पाहणाऱ्या कलमाडी यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी काँग्रेस भवनात नेण्यात न आल्याने अनेक जुन्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेस भवन हे कार्यकर्त्यांचे चर्चास्थळ असून, कलमाडी यांचे त्या ठिकाणाशी भावनिक नाते होते, असे सांगितले जाते.

निधनानंतर काही मोजके काँग्रेस नेते ‘कलमाडी हाउस’ येथे श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी गेले. मात्र, बहुतांश स्थानिक नेते व उमेदवार प्रचारात गुंतले असल्याचे दिसून आले. काँग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी काही उमेदवारांना प्रचार थांबविण्याचे सांगितले, तरीही स्थानिक पातळीवर शेवटपर्यंत ठोस निर्देश देण्यात आले नाहीत.

अंत्यसंस्कारावेळी कलमाडी यांच्या राजकीय कारकिर्दीतून पुढे आलेले काही मोजकेच काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते. विशेष बाब म्हणजे, काँग्रेस सोडून अन्य पक्षात गेलेले काही नेतेही कलमाडी यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी उपस्थित राहिले. त्यामुळे कोण आले आणि कोण गैरहजर राहिले, यावरून राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

Spread the love