महाराष्ट्रात १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुका जाहीर; भाजपातून ५४ पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी, महायुतीत वाद, राज ठाकरे व श्रीकांत शिंदेंचे सणसणीत टोले – वाचा सविस्तर राजकीय अपडेट्स.

Maharashtra Politics Updates | मुंबई:
राज्यातील राजकीय वातावरण तापत असतानाच राज्य निवडणूक आयोगाने मोठी घोषणा केली आहे. १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून, त्याचवेळी भाजप आणि महायुतीतून वादांच्या ठिणग्या उडाल्याचे चित्र आहे. आजच्या दिवसभरात राज्याच्या राजकारणात घडलेल्या ५ मोठ्या घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
1) १२ जिल्हा परिषद व १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुका जाहीर
राज्य निवडणूक आयोगाने घेतलेल्या पत्रकार परिषदेत रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, लातूर आणि धाराशिव या १२ जिल्हा परिषदांसाठी ५ फेब्रुवारी २०२6 रोजी मतदान होणार असल्याची घोषणा केली.
- उमेदवारी अर्ज: १६ ते २१ जानेवारी
- अर्ज माघार: २७ जानेवारी
- मतदान: ५ फेब्रुवारी
- निकाल: ७ फेब्रुवारी
या निवडणुकांतून ७३१ जिल्हा परिषद सदस्य आणि १४६२ पंचायत समिती सदस्य निवडले जाणार असून, त्यातील मोठ्या प्रमाणात जागा महिलांसाठी राखीव आहेत.
2) नाशिकमध्ये भाजपाची मोठी कारवाई; ५४ पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी
महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपाने नाशिकमध्ये माजी महापौरांसह ५४ पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. उमेदवारी न मिळाल्याने बंडखोरी केल्याचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आली आहे.
या निर्णयामुळे भाजपातील अंतर्गत नाराजी चव्हाट्यावर आली असून, मतदानापूर्वीच पक्षाला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.
3) श्रीकांत शिंदेंचा गणेश नाईकांना खोचक टोला
खासदार श्रीकांत शिंदे यांनी थेट गणेश नाईक यांना लक्ष्य करत,
“२०२२ चा बंडखोरीचा निर्णय झाला नसता, तर आज गणेश नाईकांना कोणी विचारलंही नसतं,” असा सणसणीत टोला लगावला.
नवी मुंबईतील प्रचार सभेत त्यांनी हे वक्तव्य केल्याने शिंदे गट आणि भाजपमधील तणाव अधिकच वाढल्याचे संकेत मिळत आहेत.
4) नाशिकमध्ये महायुतीतील मित्रपक्ष आमनेसामने
नाशिक महापालिका निवडणुकीदरम्यान भाजप आणि शिंदे गटातील वाद टोकाला गेला आहे.
भाजप नेते गिरीश महाजन यांनी शिंदे गटाच्या नेत्यांवर गंभीर आरोप करत एमडी ड्रग्ज प्रकरणाचा मुद्दा उपस्थित केला.
यावर शिंदे गटाकडून सर्व आरोप फेटाळून लावण्यात आले असून, पोलिसांत तक्रार देण्याचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे महायुतीतील एकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
5) राज ठाकरे यांची देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका मुलाखतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोचरी टीका केली.
“स्वतःच्या ताकदीवर मुख्यमंत्री होणे आणि बसवलेला मुख्यमंत्री होणे यात फरक असतो,” असे म्हणत त्यांनी भाजपच्या सध्याच्या नेतृत्वशैलीवरही प्रश्न उपस्थित केला.

More Stories
शिरूर तालुक्यातील सविंदणे येथे क्रीडा शिक्षकाला घरात घुसून मारहाण; विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन करत केली कारवाईची मागणी…
आळेफाटा येथे पिकअप आणि बोलेरो यांच्यात भीषण अपघात; एक ठार, नऊ जखमी
बारावी विज्ञान शाखेचा फिजिक्स-केमिस्ट्री पेपर फुटला; नागपूरच्या सदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल