March 23, 2026

unfilteredtruth

unfilteredtruth

महत्त्वाची बातमी ! लाडकी बहीण योजनेचा जानेवारी हप्ता रखडणार? नेमकं कारण काय? जाणून घ्या सविस्तर…..

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील जानेवारीचा हप्ता विलंबित होण्याची शक्यता. ई-केवायसी गोंधळ आणि अंगणवाडी सेविकांच्या विरोधामुळे पडताळणी रखडली असून लाखो महिलांवर परिणाम होण्याची भीती.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना दरमहा १५०० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. मात्र, जानेवारी महिन्याचा हप्ता विलंबित होण्याची शक्यता असून यामागे ई-केवायसी प्रक्रियेतील गोंधळ आणि अंगणवाडी सेविकांचा विरोध हे प्रमुख कारण ठरत आहेत.

योजनेत काही ठिकाणी अपात्र आणि बोगस लाभार्थ्यांनी लाभ घेतल्याचे निदर्शनास आल्यानंतर राज्य सरकारने ई-केवायसी अनिवार्य केली. मात्र, तांत्रिक अडचणी, कागदपत्रांतील त्रुटी आणि अपूर्ण माहितीमुळे अनेक पात्र महिलांचे ई-केवायसी पूर्ण होऊ शकले नाही. परिणामी, त्यांचा लाभ तात्पुरता बंद झाला आहे.

जळगावसह राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये ई-केवायसी अपूर्ण असलेल्या लाभार्थ्यांची घरोघर प्रत्यक्ष पडताळणी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. ही जबाबदारी अंगणवाडी सेविकांवर सोपवण्यात आली. मात्र, अंगणवाडी सेविका संघटनांनी या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवला आहे.

संघटनांचे म्हणणे आहे की, बालकल्याण, पोषण आहार आणि आरोग्याशी संबंधित कामे ही त्यांची मुख्य जबाबदारी असून, अतिरिक्त प्रशासकीय कामे देणे अन्यायकारक आहे. या मुद्द्यावरून जिल्हा परिषद प्रशासन आणि अंगणवाडी सेविका संघटना आमनेसामने आल्या असून, त्यामुळे ई-केवायसी प्रक्रिया ठप्प झाली आहे.

या तिढ्याचा थेट फटका लाखो लाडक्या बहिणींना बसण्याची शक्यता असून, जानेवारी महिन्याचा हप्ता उशिरा मिळण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सरकारकडून अद्याप कोणतीही स्पष्ट पर्यायी व्यवस्था जाहीर करण्यात आलेली नाही.

लाडकी बहीण योजनेसारख्या महत्त्वाच्या लोककल्याणकारी योजनेबाबत तातडीने निर्णय घेऊन अडचणी दूर करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले जात आहे, अन्यथा लाभार्थी महिलांचा विश्वास डळमळीत होण्याची शक्यता आहे.

Spread the love