March 23, 2026

unfilteredtruth

unfilteredtruth

बारावी विज्ञान शाखेचा फिजिक्स-केमिस्ट्री पेपर फुटला; नागपूरच्या सदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

राज्यात सुरू असलेल्या बारावीच्या परीक्षेदरम्यान विज्ञान शाखेतील फिजिक्स आणि केमिस्ट्री या विषयांच्या प्रश्नपत्रिकांबाबत गंभीर प्रकार समोर आला आहे. या संदर्भात नागपूर शहरातील सदर पोलीस ठाणे येथे अज्ञातांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून तपास सुरू करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, परीक्षा सुरू होण्यापूर्वी काही वेळ आधीच संबंधित विषयांचे प्रश्न व्हॉट्सअॅपद्वारे प्रसारित झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. विशेषतः केमिस्ट्री विषयाच्या पेपरपूर्वी विद्यार्थ्यांच्या एका ग्रुपमध्ये प्रश्नपत्रिकेसदृश मजकूर शेअर झाल्याची बाब उघड झाली. याआधी फिजिक्स विषयाबाबतही अशीच चर्चा रंगली होती.

हा प्रकार नागपूरमधील सेंट उर्सुला परीक्षा केंद्र येथे लक्षात आला. परीक्षेदरम्यान एका विद्यार्थिनीचे वारंवार बाहेर जाणे पर्यवेक्षकांच्या निदर्शनास आले. चौकशीअंती तिच्याकडून मोबाईल जप्त करण्यात आला. मोबाईलची प्राथमिक तपासणी केली असता संबंधित ग्रुपमध्ये प्रश्नपत्रिकेसारखा मजकूर परीक्षा सुरू होण्यापूर्वी शेअर झाल्याचे आढळल्याची माहिती सूत्रांनी दिली.

घटनेची माहिती मिळताच केंद्रप्रमुखांनी पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर पोलिसांनी मोबाईल जप्त करून तांत्रिक तपासाला सुरुवात केली आहे. संबंधित व्हॉट्सअॅप ग्रुपचे अॅडमिन, सदस्य आणि संदेशाचा स्त्रोत याबाबत सायबर पथक तपास करत आहे.

दरम्यान, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ मार्फत बारावीची परीक्षा राज्यभर नियोजित वेळापत्रकानुसार सुरू आहे. लाखो विद्यार्थी परीक्षेला बसले असून केंद्रांवर कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मोबाईल वा अन्य इलेक्ट्रॉनिक साधनांना परीक्षा केंद्रात बंदी असल्याची पुन्हा एकदा स्पष्ट सूचना देण्यात आली आहे.

प्रश्नपत्रिका अधिकृत होत्या की बनावट, याबाबत अद्याप निश्चित माहिती समोर आलेली नाही. तपासानंतरच पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचे समजते. गरज भासल्यास संबंधित पेपर रद्द करण्याचा पर्यायही विचाराधीन राहू शकतो.

पोलिसांनी विद्यार्थ्यांनी व पालकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले आहे. पुढील तपास सुरू आहे.

Spread the love