
पुणे: ‘ड्रग्ज फ्री पुणे’ (Drugs Free Pune) मोहिमेअंतर्गत पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने एक मोठी आणि धडक कारवाई केली आहे. अंमली पदार्थ विरोधी पथक-१ ने कात्रज भागात सापळा रचून तब्बल ५ कोटी ७९ लाख १० हजार रुपये किमतीचे २ किलो ८९५ ग्रॅम वजनाचे ‘मेफेड्रॉन’ (एम.डी.) हे अंमली पदार्थ जप्त केले आहेत. या प्रकरणी रेकॉर्डवरील एका सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
प्रशांत सुरेश सावंत (वय ३८ वर्ष, सध्या रा. लेन नं.६, खेसेपार्क लोहगाव रोड, पुणे; मूळ रा. येरवडा, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
कात्रज चौकात पहाटेच्या सुमारास थरारक कारवाई
पोलीस आयुक्त श्री. अमितेश कुमार यांनी शहरातील ड्रग्ज रॅकेटचे समूळ उच्चाटन करण्यासाठी कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार अंमली पदार्थ विरोधी पथक-१ चे अधिकारी आणि अंमलदार ८ जुलै २०२६ च्या रात्री गस्त घालत होते. ९ जुलै २०२६ रोजी पहाटे पावणेपाचच्या (०४:४९ वा.) सुमारास कात्रज चौकातील आय.सी.आय.सी.आय. बँकेसमोरील नवीन उड्डाणपुलाखाली, सावंत कॉर्नर येथील बस स्टॉपजवळ एक संशयित इसम प्रवासी बॅग घेऊन थांबल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
संशयावरून पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता, त्याच्या बॅगमध्ये ५ कोटी ७९ लाख रुपयांचे २ किलो ८९५ ग्रॅम मेफेड्रॉन (एम.डी.) आणि इतर साहित्य मिळून आले. पोलिसांनी ड्रग्जसह सर्व मुद्देमाल तातडीने जप्त केला.
भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
याप्रकरणी अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस अंमलदार अतुल क्षिरसागर यांनी सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीवरून भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात आरोपी प्रशांत सावंत याच्याविरुद्ध एन.डी.पी.एस. ॲक्ट (NDPS Act) कलम ८ (क), २१ (क) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश कोतकर करत आहेत.
या पथकाने केली कामगिरी:
ही धडक कारवाई पोलीस आयुक्त श्री. अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त श्री. संजय दराडे, अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्रीमती तेजस्वी सातपुते, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्री. गौहर हसन, आणि सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये अंमली पदार्थ विरोधी पथक-१ च्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती तृप्ती सोनवणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे, पोलीस उपनिरीक्षक योगेश कोतकर, तसेच पोलीस अंमलदार विठ्ठल साळुंखे, संजय राजे, विजय कांबळे, निशिकांत सावंत, तुषार साळुंके, अतुल क्षिरसागर, मंगेश गुंड, अमोल सरडे, विशाल भिलारे, सचिन लोहार आणि आशा भिंगारे यांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली.

More Stories
पुण्यात खळबळ! विक्रीसाठी आणलेली ४ गावठी पिस्टल जप्त; खंडणी विरोधी पथकाची धडक कारवाई, एक जण जेरबंद…
पुणे ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई: दौंड तालुक्यातील खुटबाव येथे दरोड्याच्या तयारीत असलेले आंतरजिल्हा दरोडेखोर जेरबंद…
दौंड तालुक्यातील दापोडी येथे बेकायदेशीर गावठी हातभट्टी दारूवर पोलिसांची कारवाई; एकावर गुन्हा दाखल…