
पुणे : विद्यार्थ्यांमधील उद्योजकीय कौशल्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सतर्फे शनिवारी (ता. ३१ ऑक्टोबर) ‘कारोबार ९.० – सूर्यभारत जननेक्स्ट स्टार्टअप फेस्ट’चे आयोजन करण्यात आले आहे. बावधन येथील सूर्यदत्त कॅम्पसमध्ये सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत हा महोत्सव पार पडणार आहे.
या महोत्सवात विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी भारतीय युनिकॉर्न कंपन्यांचा व्यावसायिक प्रवास, त्यांच्या व्यवसायाच्या संकल्पना, विपणन धोरणे, गुंतवणूक आणि व्यवसाय विस्ताराच्या रणनीती सादर करणार आहेत. विविध स्टॉल्स, व्यावसायिक प्रात्यक्षिके आणि ‘स्टॉल टू सेल’ या उपक्रमातून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष व्यवसायाचा अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे.
उत्पादनाचे सादरीकरण, विपणन, विक्री, ग्राहकांशी संवाद आणि व्यवसाय व्यवस्थापन अशा विविध कौशल्यांचा विकास या महोत्सवाच्या माध्यमातून केला जाणार आहे. तसेच विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, सर्जनशीलता, निर्णयक्षमता आणि संघभावना विकसित करण्यावर भर दिला जाणार आहे.

या उपक्रमाच्या पुढील टप्प्यात सूर्यभारत इंडस्ट्रियल रिसर्च ज्ञानपीठाच्या (एसबीआयआरडी) माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र मार्गदर्शन आणि नवोन्मेष विकासाचे व्यासपीठ उभारण्याचा प्रस्ताव आहे. यामध्ये निवडक विद्यार्थी आणि नवउद्योजकांना अनुभवी उद्योजक, उद्योग क्षेत्रातील नेते, संशोधक आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळणार आहे.
‘विकसित भारत @ २०४७’ या संकल्पनेशी सुसंगत असलेल्या या महोत्सवातून युवकांमध्ये उद्योजकता, नवोन्मेष, कौशल्यविकास आणि रोजगारनिर्मितीची मानसिकता विकसित करण्याचा आयोजकांचा प्रयत्न आहे.
याबाबत सूर्यदत्तचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. यावेळी उपाध्यक्षा व सचिव सुषमा चोरडिया, मुख्य कार्यकारी अधिकारी अक्षित कुशल आणि अधिष्ठाता प्रा. डॉ. प्रतीक्षा वाबळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. या महोत्सवाला विद्यार्थी, पालक, उद्योजक आणि नागरिकांनी भेट द्यावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.


More Stories
महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक: महाविकास आघाडीला ३, तर महायुतीला २ जागा…
लोणी काळभोरमध्ये ‘खेत बचाव अभियान’; शेतकऱ्यांना संतुलित खत वापर आणि नैसर्गिक शेतीचे मार्गदर्शन…
टीएमव्हीच्या लॉ कॉलेजमध्ये दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद संपन्न…