November 17, 2026

unfilteredtruth

unfilteredtruth

लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकपदी समाधान पवार; प्रदीप पवारांसह सहा पोलीस निरीक्षकांच्या बदल्या…

पुणे : पुणे शहर पोलीस दलात पुन्हा एकदा प्रशासकीय फेरबदल करण्यात आले आहेत. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुरुवारी (दि. १२ नोव्हेंबर) सहा पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश जारी केले. या बदल्यांमध्ये लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी समाधान सर्जेराव पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे विद्यमान वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप पवार यांची खडक पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेत बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी खडक पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेत कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक समाधान सर्जेराव पवार यांच्याकडे लोणी काळभोर पोलीस ठाण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

याशिवाय विशेष शाखेतील पोलीस निरीक्षक शशिकांत भरत चव्हाण यांची बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. बंडगार्डन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संतोष लक्ष्मण पांढरे यांची वाहतूक शाखेत बदली करण्यात आली आहे.

तसेच लष्कर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज संभाजी हांडे यांची विशेष शाखेत, तर गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षक मारुती भिवसेन खेडकर यांची लष्कर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम २२ (एन) मधील तरतुदीनुसार १२ नोव्हेंबर रोजी पोलीस आस्थापना मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीतील चर्चेनंतर प्रशासकीय कारणास्तव या बदल्यांना मान्यता देण्यात आली.

बदली झालेल्या सर्व पोलीस निरीक्षकांनी नव्या पदस्थापनेच्या ठिकाणी तातडीने हजर होऊन पदभार स्वीकारावा आणि त्याबाबतचा अनुपालन अहवाल सादर करावा, असे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत.

दरम्यान, समाधान पवार यांच्याकडे आता लोणी काळभोर पोलीस ठाण्याची जबाबदारी आली असून, त्यांच्या नेतृत्वाखाली परिसरातील कायदा व सुव्यवस्था आणि पोलीस प्रशासनाचे कामकाज कशा पद्धतीने पुढे जाते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Spread the love

You may have missed