
पुणे : राज्यातील मत्स्यव्यवसाय क्षेत्राचा विकास, मत्स्य उत्पादनात वाढ आणि मत्स्य व्यावसायिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या मत्स्यव्यवसाय विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. या योजनेअंतर्गत विविध घटकांसाठी अनुदान आणि आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
महाराष्ट्र शासनाने या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी MahaDBT 2.0 पोर्टल सुरू केले आहे. योजनेतील विविध लाभांसाठी पात्र लाभार्थ्यांना आता ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. यामुळे अर्ज प्रक्रिया अधिक सुलभ होणार असून आवश्यक कागदपत्रे प्रत्यक्ष सादर करण्याची गरज कमी होणार आहे.
राज्य शासनाच्या निर्णयानुसार मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत एकूण २८ योजनांना मान्यता देण्यात आली आहे. त्यापैकी २४ योजनांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. उर्वरित योजनांसाठीही टप्प्याटप्प्याने कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती प्रसिद्धीपत्रकात देण्यात आली आहे.
या योजनेंतर्गत मत्स्यबीज उत्पादन केंद्रांची स्थापना, मत्स्यबीज संवर्धन, मत्स्य खाद्य निर्मिती, नवीन मत्स्यसंवर्धन तलाव बांधकाम, जुन्या तलावांची दुरुस्ती, पिंजरा पद्धतीने मत्स्यसंवर्धन, बर्फ कारखाने उभारणी, शीतगृह, मासळी विक्री केंद्र, जीव रक्षक उपकरणे आणि मत्स्यव्यवसायाशी संबंधित विविध सुविधांसाठी आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे.
योजनेच्या लाभासाठी इच्छुक मत्स्य व्यावसायिक, मच्छीमार आणि संबंधित संस्थांनी MahaDBT 2.0 पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, पुणे कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ :
https://mahadbt2.maharashtra.gov.in/scheme-apply
पुणे जिल्ह्यातील लाभार्थ्यांना अर्ज प्रक्रिया किंवा योजनेबाबत मार्गदर्शन मिळावे यासाठी सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, पुणे कार्यालयात ‘मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना सहाय्यता कक्ष’ स्थापन करण्यात आला आहे. त्यामुळे अर्ज करताना अडचणी आल्यास संबंधित कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

More Stories
लोणी काळभोरच्या सह्याद्री स्पोर्ट अँड फिटनेस सेंटरचे वेटलिफ्टिंगमध्ये घवघवीत यश; ८ खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड…
विद्यार्थ्यांच्या उद्योजकीय कल्पनांना मिळणार व्यासपीठ; सूर्यदत्तमध्ये उद्या ‘कारोबार ९.०’ स्टार्टअप फेस्ट…
महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक: महाविकास आघाडीला ३, तर महायुतीला २ जागा…