March 23, 2026

unfilteredtruth

unfilteredtruth

Nashik Traffic Update : अपघात रोखण्यासाठी नाशिक महापालिकेचा मोठा निर्णय; डाव्या वळणांवरील ‘ब्लाइंड स्पॉट’ हटवणार

नाशिक शहरातील अपघात रोखण्यासाठी महापालिकेने डाव्या वळणांवरील ब्लाइंड स्पॉट हटवण्याची

नाशिक : शहरातील वाढती वाहतूक आणि अपघातांचे प्रमाण लक्षात घेता नाशिक महानगरपालिकेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. रस्त्यावरील डाव्या वळणांवर निर्माण होणारे ‘ब्लाइंड स्पॉट’ दूर करून अपघातांना आळा घालण्याची मोहीम महापालिकेच्या वतीने राबवली जाणार आहे.

या मोहिमेअंतर्गत महापालिका आयुक्त मनिषा खत्री यांनी त्र्यंबक रोड आणि दिंडोरी रोडवरील डाव्या वळणांची प्रत्यक्ष पाहणी केली. वाहनचालकांना स्पष्ट दृश्यता न मिळाल्यामुळे होणारे अपघात टाळण्यासाठी अडथळा ठरणाऱ्या भिंती, अतिक्रमणे आणि इतर भौतिक संरचना हटविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

सन २०२४-२५ या कालावधीत नाशिक-त्र्यंबकेश्वर मार्गावर सविस्तर सर्वेक्षण करण्यात आले होते. या अभ्यासानुसार, रस्त्यावरील अडथळे हटवून आवश्यक संरचनात्मक सुधारणा केल्यास गंभीर अपघातांमध्ये २५ ते ४५ टक्क्यांपर्यंत घट होऊ शकते, असा निष्कर्ष समोर आला आहे.

डाव्या वळणांवर अतिक्रमण, अनियमित पार्किंग, जाहिरात फलक, बांधकाम साहित्य यामुळे वाहनचालकांची दृश्यता कमी होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे हे सर्व अडथळे तातडीने हटवून वळण मोकळे करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

त्र्यंबक रोडवरील शरणपूर पोलिस स्टेशन परिसरात डाव्या वळणावरील ब्लाइंड स्पॉट दूर करण्यासाठी विशेष उपाययोजना प्रस्तावित करण्यात आली आहे. तसेच दिंडोरी रोडवरील मेरी इन्स्टिट्यूट परिसरात वाहनचालकांना पुरेशी दृश्यता मिळावी यासाठी संबंधित भिंत आतील बाजूस हलविण्यात येणार आहे.

महापालिकेच्या प्राथमिक पाहणीनुसार त्र्यंबक रोड आणि दिंडोरी रोडवरील सुमारे ४० डाव्या वळणांवरील ब्लाइंड स्पॉट ओळखण्यात आले असून, ते टप्प्याटप्प्याने दूर करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या मोहिमेमुळे वाहतूक कोंडी कमी होऊन नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य मिळणार आहे.

Spread the love