March 23, 2026

unfilteredtruth

unfilteredtruth

शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला; जीव वाचवताना तरुण थेट विहिरीत, बिबट्यासह दोघांचा मृत्यू

नाशिकच्या सिन्नर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात तरुण शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. जीव वाचवताना तरुण आणि बिबट्या दोघेही विहिरीत पडले. परिसरात भीतीचे वातावरण.

नाशिक | सिन्नर :
गावखेड्यात वाढलेल्या बिबट्याच्या दहशतीचा आणखी एक भयावह प्रकार नाशिक जिल्ह्यात समोर आला आहे. सिन्नर तालुक्यातील शिवडी गावात शेतात कामासाठी गेलेल्या तरुण शेतकऱ्यावर बिबट्याने अचानक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेत जीव वाचवण्याच्या प्रयत्नात तरुण थेट विहिरीत पडला, तर पाठलाग करत बिबट्यानेही विहिरीत उडी घेतली. दुर्दैवाने या घटनेत तरुणासह बिबट्याचाही मृत्यू झाला.

मृत तरुणाचे नाव गोरख जाधव असून तो शेतातील कामासाठी सकाळी बाहेर पडला होता. सकाळी साडेअकराच्या सुमारास तो शेतातील विहिरीजवळ बसून जेवण करत असताना अचानक बिबट्याने त्याच्यावर झडप घातली. प्रसंगावधान राखत गोरखने पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र जीवाच्या आकांताने धावताना तो थेट विहिरीत कोसळला.

गोरखचा पाठलाग करणाऱ्या बिबट्यानेही विहिरीत उडी घेतल्याने परिस्थिती अधिकच गंभीर झाली. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तात्काळ वन विभाग आणि पोलिसांना कळवले. घटनास्थळी दाखल झालेल्या वन विभागाच्या पथकाने विहिरीत पिंजरा उतरवून बिबट्याला जेरबंद केले.

दरम्यान, जीवरक्षकांच्या मदतीने विहिरीत शोधमोहीम राबवण्यात आली. मात्र, गोरख जाधव यांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. काही तास पाण्यात अडकून राहिल्याने बिबट्याचाही मृत्यू झाला.

या घटनेनंतर गावात एकच खळबळ उडाली असून, तरुण शेतकऱ्याचा जीव गेल्याने ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला. काही काळ बिबट्याला बाहेर काढण्यास ग्रामस्थांनी विरोधही केला, मात्र वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.

विशेष म्हणजे, या घटनेपूर्वी काही वेळ आधी याच बिबट्याने परिसरातील आणखी एका नागरिकावर हल्ला केल्याची माहिती समोर आली असून, जखमी व्यक्तीवर सध्या उपचार सुरू आहेत. या संपूर्ण घटनेमुळे शिवडीसह परिसरातील गावांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

Spread the love