पुण्यात कात्रज-कोंढवा परिसरात आर्थिक वादातून एका तरुणाचे त्याच्याच मित्रांनी अपहरण करून विवस्त्र करत अमानुष मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

पुणे :
संस्कृती आणि शिक्षणासाठी ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र दिसत आहे. अशातच कात्रज-कोंढवा रस्त्यावरील गोकुळनगर परिसरात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने शहर हादरले आहे. आर्थिक व्यवहारातून निर्माण झालेल्या वादातून एका तरुणाचे त्याच्याच ओळखीच्या मित्रांनी अपहरण करून त्याच्यावर अमानुष अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे.
पीडित तरुण हा वाहन खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतो आणि तो कोंढवा परिसरात वास्तव्यास आहे. आरोपी हे त्याचे जवळचे परिचित असून, पैशांच्या देवाणघेवाणीवरून त्यांच्यात वाद निर्माण झाला होता. हा वाद इतका टोकाला गेला की 31 डिसेंबरच्या रात्री सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास आरोपींनी तरुणाला जबरदस्तीने कारमध्ये बसवून अपहरण केले.
आरोपींनी त्याला गोकुळनगरजवळील एका सुनसान आणि मोकळ्या जागी नेले. तेथे त्याला विवस्त्र करून लाथाबुक्क्यांनी आणि क्रूरपणे मारहाण करण्यात आली. या संपूर्ण प्रकाराचे मोबाईलमध्ये चित्रीकरण करण्यात आले असून, हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली.
इतकेच नव्हे तर मारहाणीदरम्यान मंगेश माने याने कारमधील पिस्तुलाचा धाक दाखवत पोलिसांत तक्रार केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. पीडितावर गोळीबारही करण्यात आला, मात्र सुदैवाने तो थोडक्यात बचावला.
या घटनेनंतर पीडित तरुणाने येवलेवाडी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आयुष कामठे, अभि म्हस्के, अभि पाटील, मंगेश माने, कौशल ऊर्फ ऋषी मोरे यांच्यासह एकूण नऊ जणांविरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले आहेत. काही आरोपी अद्याप फरार असून, त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे.
ही घटना पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीचे गंभीर उदाहरण मानली जात असून, आर्थिक वादातून कायदा हातात घेण्याचे प्रकार समाजासाठी धोकादायक ठरत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.

More Stories
लोणी काळभोरमधील सिद्राम मळा परिसरात चोरट्यांचा वावर; सीसीटीव्हीत तीन संशयित कैद, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
शिरूर तालुक्यातील सविंदणे येथे क्रीडा शिक्षकाला घरात घुसून मारहाण; विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन करत केली कारवाईची मागणी…
आळेफाटा येथे पिकअप आणि बोलेरो यांच्यात भीषण अपघात; एक ठार, नऊ जखमी