September 15, 2026

unfilteredtruth

unfilteredtruth

हरियाणात 19 वर्षांनंतर मुलाचा जन्म; 10 मुलींनंतर कुटुंबात आनंदाचं वातावरण

हरियाणातील जिंद जिल्ह्यात 37 वर्षीय महिलेने दहा मुलींच्या जन्मानंतर मुलाला जन्म दिला आहे. ही हाय-रिस्क प्रसुती असून माता आणि बाळाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

हरियाणामधील जिंद जिल्ह्यात एक अनोखी आणि चर्चेचा विषय ठरलेली घटना समोर आली आहे. 37 वर्षीय महिलेने दहा मुलींच्या जन्मानंतर आता एका मुलाला जन्म दिला असून, हे तिचं अकरावं अपत्य आहे. ही प्रसुती उचाना शहरातील ओजस रुग्णालयात पार पडली.

डॉक्टरांच्या माहितीनुसार ही प्रसुती हाय-रिस्क स्वरूपाची होती. प्रसुतीदरम्यान महिलेला तीन युनिट रक्त द्यावं लागलं. मात्र सध्या माता आणि नवजात बाळ दोघांचीही प्रकृती स्थिर असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

ही महिला फतेहाबाद जिल्ह्यातील रहिवासी असून, तिचं लग्न 19 वर्षांपूर्वी झालं आहे. 3 जानेवारी रोजी तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं आणि 4 जानेवारी रोजी तिने बाळाला जन्म दिला.

वडील म्हणाले – “जे काही झालं ते देवाच्या इच्छेने”

नवजात बाळाचे वडील संजय कुमार (वय 38) हे रोजंदारीवर काम करतात. त्यांनी सांगितलं की, त्यांच्या काही मोठ्या मुलींनाही भाऊ हवा होता. “हे आमचं अकरावं मूल आहे. माझं उत्पन्न मर्यादित असलं तरी मी माझ्या सर्व मुलींना शिक्षण देण्याचा प्रयत्न करत आहे. जे काही झालं ते देवाच्या इच्छेनुसार झालं असून आम्ही आनंदी आहोत,” असं त्यांनी स्पष्ट केलं.

तसंच, कोणत्याही सामाजिक किंवा पितृसत्ताक दबावाखाली हा निर्णय घेतलेला नसल्याचंही त्यांनी सांगितलं.

10 बहिणींनी दिलं भावाला नाव

या कुटुंबातील विशेष बाब म्हणजे दहा बहिणींनी एकत्र येऊन आपल्या नवजात भावाचं नाव ‘दिलखुश’ ठेवलं आहे. वडिलांना त्यांच्या सर्व मुलींची नावं आठवण्यात अडचण येत असल्याचंही समोर आलं आहे.

कुटुंबातील मुलींचं शिक्षण

या जोडप्याची सर्वात मोठी मुलगी सरिना ही बारावीत शिकत आहे. त्यानंतर अमृता (अकरावी), सुशीला (सातवी), किरण (सहावी), दिव्या (पाचवी), मन्नत (तिसरी), कृतिका (दुसरी), अमनीश (पहिली) असून लक्ष्मी आणि वैशाली या अद्याप लहान आहेत.

19 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मुलाचा जन्म झाल्याने कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे. मात्र, या घटनेमुळे महिलांच्या आरोग्याशी संबंधित मुद्दे आणि सामाजिक मानसिकतेवरही चर्चा सुरू झाली आहे.

Spread the love

You may have missed