March 23, 2026

unfilteredtruth

unfilteredtruth

BMC Election 2026 आधी मनसेला धक्का; संतोष धुरी भाजपमध्ये दाखल

BMC Election 2026 पार्श्वभूमीवर मनसेचे माजी नगरसेवक संतोष धुरी भाजपमध्ये दाखल झाले. त्यांच्या प्रवेशावर मनसे नेते मारुती दळवी यांनी जोरदार टीका करत धुरींवर गद्दारीचा आरोप केला.

मुंबई महापालिका निवडणूक 2026 च्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला असून, पक्षांतराच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. अशातच मनसेचे माजी नगरसेवक संतोष धुरी यांनी मंगळवारी (ता. 6) भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या या निर्णयानंतर मनसेत तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

राज ठाकरेंचे निकटवर्तीय आणि मनसे नेते मारुती दळवी यांनी संतोष धुरींवर जोरदार शब्दांत टीका केली आहे. माध्यमांशी बोलताना दळवी म्हणाले, “राजसाहेबांचा आधार नसता तर संतोष धुरींना राजकारणात ओळख मिळालीच नसती. कुवत नसतानाही ते नगरसेवक झाले.”

“गद्दारी होणार, हे आधीच सांगितलं होतं”

मारुती दळवी यांनी दावा केला की, 15 दिवसांपूर्वी त्यांनी स्वतः राज ठाकरे यांची भेट घेऊन संतोष धुरी भविष्यात गद्दारी करू शकतात, असा इशारा दिला होता. “हा व्यक्ती लादलेला होता. माझा हक्काचा पदभार काढून त्याला देण्यात आला,” असा आरोपही त्यांनी केला.

“राज ठाकरेंमुळेच राजकीय ओळख”

दळवी पुढे म्हणाले, “दादरमध्ये बसून तोडपाणी करणारा हा नेता राज ठाकरेंच्या स्पर्शामुळेच नगरसेवक झाला. नेत्यांच्या चमचेगिरीमुळे पदं मिळवली गेली.”
तसेच, “मी संयम ठेवतोय, नाहीतर तोंड उघडलं तर मोठा राजकीय भूकंप होईल,” असा इशाराही त्यांनी दिला.

भाजप प्रवेशानंतर मनसेत खळबळ

संतोष धुरी यांच्या भाजप प्रवेशामुळे मनसेमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. दळवी यांनी स्पष्टपणे सांगितले की, “ठाकरे बंधूंचीच महापालिकेत सत्ता येईल,” असा विश्वास त्यांना आहे.


कोण आहेत संतोष धुरी?

संतोष धुरी हे मनसेचे माजी नगरसेवक असून, ते मुंबई शहर अध्यक्ष संदीप देशपांडे यांचे निकटवर्तीय मानले जातात. मनसेच्या अनेक आंदोलनांमध्ये ते सक्रिय होते. मागील महापालिका निवडणुकीत त्यांनी मनसेकडून निवडणूक लढवली होती, मात्र पराभव स्वीकारावा लागला होता.

यंदा ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीतून वॉर्ड क्रमांक 194 मधून निवडणूक लढवण्याची त्यांची इच्छा होती. मात्र जागावाटपात ती जागा उद्धवसेनेला मिळाल्याने नाराजी वाढली आणि अखेर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

Spread the love