March 23, 2026

unfilteredtruth

unfilteredtruth

दौंड-पाटस मार्गावरील हॉटेलमध्ये एलपीजी सिलेंडरचा भीषण स्फोट; 10 कर्मचारी जखमी, 6 जणांची प्रकृती गंभीर

दौंड-पाटस अष्टविनायक मार्गावर असलेल्या हॉटेलमध्ये गॅस सिलेंडरचा जोरदार स्फोट झाल्याची घटना घडली असून या दुर्घटनेत 10 कर्मचारी जखमी आहेत. त्यापैकी 6 जण गंभीर जखमी असून त्यांना पुण्यात उपचारासाठी हलवण्यात आले आहे.

दौंड (पुणे जिल्हा):
दौंड-पाटस अष्टविनायक मार्गावरील मांढरे मळा परिसरात असलेल्या एका हॉटेलमध्ये एलपीजी गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या दुर्घटनेत हॉटेलमध्ये काम करणारे एकूण 10 कर्मचारी जखमी असून त्यापैकी 6 जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

दौंड शहरापासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या हॉटेल जगदंबामध्ये दुपारच्या सुमारास ही घटना घडली. हॉटेलच्या भटारखान्यातील घरगुती वापराच्या एलपीजी सिलेंडरचा अचानक स्फोट झाल्याने आग लागली. स्फोट इतका तीव्र होता की हॉटेलच्या छतावरील पत्रे उडून गेली, तसेच दर्शनी भागातील काचेच्या खिडक्या तावदानासह खाली कोसळल्या.

स्फोटात भाजलेल्या कर्मचाऱ्यांना स्थानिक नागरिकांच्या मदतीने तातडीने दौंड शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी गंभीर जखमी असलेल्या सहा कर्मचाऱ्यांना पुढील उपचारासाठी पुण्यातील रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच दौंड नगरपालिका तसेच कुरकुंभ एमआयडीसी अग्निशामक दलाने घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवले. अग्निशामक विभागाच्या तात्काळ कारवाईमुळे मोठा अनर्थ टळला असल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, हॉटेलमधून एकूण 21 गॅस सिलेंडर बाहेर काढण्यात आले असून त्यामध्ये 14 घरगुती वापराचे आणि 7 वाणिज्य वापराचे सिलेंडर असल्याची माहिती अग्निशामक विभागाने दिली आहे.

दौंड पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून दुर्घटनेचा तपास सुरू आहे. या घटनेत 10 जण जखमी झाले असून 6 जणांची प्रकृती गंभीर असल्याची पुष्टी दौंड पोलिस ठाण्याचे निरीक्षक गोपाळ पवार यांनी केली आहे.

Spread the love