March 23, 2026

unfilteredtruth

unfilteredtruth

कोल्हापुरातून मोठी बातमी

भूल न देता फुफ्फुसाची श्वासनलिका जोडण्याची देशातील पहिली यशस्वी शस्त्रक्रिया; सीपीआर रुग्णालयात वैद्यकीय इतिहास घडला

कोल्हापुरातील CPR रुग्णालयात भूल न देता हार्ट-लंग मशीनच्या साहाय्याने फुफ्फुसाची श्वासनलिका जोडण्याची देशातील पहिली यशस्वी शस्त्रक्रिया.

कोल्हापूर | आरोग्य प्रतिनिधी

कोल्हापुरातील सीपीआर (राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय) येथे वैद्यकीय क्षेत्रात ऐतिहासिक कामगिरी नोंदवली गेली आहे. भूल देणे किंवा व्हेंटिलेटर वापरणे अशक्य असलेल्या अवस्थेत एका तरुणाच्या फुफ्फुसाची अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडण्यात आली आहे. विशेष म्हणजे, ‘हार्ट-लंग मशीन’च्या सहाय्याने तुटलेली श्वासनलिका जोडण्याची ही शस्त्रक्रिया देशात प्रथमच करण्यात आल्याचा दावा रुग्णालय प्रशासनाने केला आहे.

अपघातग्रस्त सोहम माळवे हा तरुण दुचाकीवरून पुण्याकडे जात असताना किणी गावाजवळ डिव्हायडरला धडकल्याने गंभीर जखमी झाला. छातीवर झालेल्या तीव्र आघातामुळे त्याच्या फुफ्फुसातील श्वासनलिका पूर्णपणे तुटल्याचे तपासणीत निष्पन्न झाले. ही स्थिती अत्यंत नाजूक असल्याने त्याला भूल देणे किंवा व्हेंटिलेटरवर ठेवणे अशक्य होते.

प्राथमिक रुग्णालयातून मुंबई किंवा पुण्यात हलविण्याचा सल्ला देण्यात आला होता. मात्र, नातेवाइकांनी त्याला सीपीआर रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेतला. येथे सिटी स्कॅन व इतर पूरक तपासण्यांनंतर परिस्थिती अधिक स्पष्ट झाली.

हृदयशस्त्रक्रियातज्ज्ञ डॉ. किशोर देवरे यांनी फेमोरो बायपास तंत्रज्ञानाचा वापर करून रुग्णाला ‘हार्ट-लंग मशीन’वर नेले. त्यामुळे रुग्णाचे श्वसन नियंत्रित ठेवणे शक्य झाले. त्यानंतर छाती उघडून तुटलेली श्वासनलिका आणि रक्तवाहिन्या यशस्वीरीत्या पुन्हा जोडण्यात आल्या. शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.

ही अत्यंत जोखमीची आणि गुंतागुंतीची शस्त्रक्रिया भूल न देता पार पाडणे हे भारतीय वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठे यश असल्याचे अधिष्ठाता व हृदयशस्त्रक्रियातज्ज्ञ डॉ. सदानंद भिसे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

या शस्त्रक्रियेसाठी भूलतज्ज्ञ डॉ. माजीद मुल्ला, डॉ. हेमलता देसाई यांच्यासह डॉ. संदीप मोहिते, डॉ. पल्लवी पवार, दीपाली जाधव, रेखा पाटील, अरुण पाटील, रॉजर कदम आणि विनोद पवार यांच्या सहकार्यामुळे हे यश शक्य झाल्याचे त्यांनी नमूद केले.


विषबाधेतील तरुणास जीवदान

दरम्यान, सीपीआर रुग्णालयाच्या मेडिसिन विभागाने आणखी एक उल्लेखनीय कामगिरी केली आहे. विषबाधेमुळे अत्यवस्थ अवस्थेत दाखल झालेल्या एका तरुणावर सलग चार दिवस अतिदक्षता उपचार करून त्याचे प्राण वाचवण्यात डॉक्टरांना यश आले. उपचारानंतर प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झाल्याने पाचव्या दिवशी रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला. ही उपचारसेवा डॉ. अनिता परितेकर व त्यांच्या वैद्यकीय पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

Spread the love