September 12, 2026

unfilteredtruth

unfilteredtruth

पुणे: कर्जाचा डोंगर अन् शेतातील नुकसान; MPSC ची तयारी करणाऱ्या तरुणाची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये व्यथा उघड…

पुणे: पुण्यात स्पर्धा परीक्षेची (MPSC) तयारी करणाऱ्या एका तरुण विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रथमेश देशमुख असे या दुर्दैवी विद्यार्थ्याचे नाव आहे. त्याने टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वी एक सुसाईड नोट लिहून ठेवली असून, त्यात आत्महत्येमागील आर्थिक अडचणींचे मुख्य कारण नमूद केले आहे. या घटनेमुळे पुण्यात शिकणाऱ्या स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली असून तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

सुसाईड नोटमधून समोर आले आत्महत्येचे कारण

​मिळालेल्या माहितीनुसार, मृत प्रथमेश देशमुख हा मूळचा धाराशिव जिल्ह्यातील परंडा येथील रहिवासी होता. तो गेल्या काही काळापासून पुण्यात राहून MPSC परीक्षेची तयारी करत होता. त्याने लिहिलेल्या सुसाईड नोटनुसार, त्याच्यावर सुमारे अडीच लाख रुपयांचे कर्ज होते. वडिलांचे छत्र हरपल्यानंतर त्याच्या कुटुंबाची जबाबदारी, चार बहिणी आणि आईचा सांभाळ करण्याचे आव्हान त्याच्यावर होते.

​गावाकडे असलेल्या शेतातील सोयाबीनचे पीक पूर्णपणे करपून गेल्यामुळे कुटुंबाचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते. एका बाजूला अस्मानी संकट आणि दुसऱ्या बाजूला MPSC परीक्षांच्या अनिश्चिततेमुळे तो प्रचंड मानसिक तणावात होता. याच नैराश्यातून त्याने नारायण पेठ परिसरातील आपल्या राहत्या ठिकाणी आयुष्य संपवले.

पोलीस तपास आणि विद्यार्थ्यांचा आक्रोश

​याप्रकरणी पुण्यातील पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस सुसाईड नोटच्या आधारे अधिक तपास करत आहेत.

​दरम्यान, या घटनेनंतर MPSC विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींनी आणि संघटनांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. “शेतातील पिकांचे झालेले नुकसान, दुष्काळ आणि स्पर्धा परीक्षा प्रक्रियेतील त्रुटींमुळे विद्यार्थी मानसिक तणावाखाली येत आहेत. सरकारने शेतकरी आणि स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुणांच्या समस्यांकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे,” अशी मागणी विद्यार्थी प्रतिनिधींनी केली आहे.

Spread the love

You may have missed