लाडकी बहीण योजनेअंतर्गत संक्रांतीपूर्वीच डिसेंबर महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे.

मुंबई :
राज्यातील लाडक्या बहिणींसाठी दिलासादायक बातमी असून, मकर संक्रांतीपूर्वीच लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1500 रुपयांचा हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. निवडणूक आचारसंहितेच्या चौकटीत नियमित लाभ देण्यास राज्य निवडणूक आयोगाने परवानगी दिल्यानंतर आजपासून कोट्यवधी लाभार्थींना योजनेचा लाभ मिळू लागला आहे. सकाळपासूनच अनेक महिलांना खात्यात पैसे जमा झाल्याचे मोबाईल संदेश प्राप्त होत आहेत.
राज्यात महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहिता लागू आहे. या काळात कोणत्याही योजनेचा लाभ अग्रिम स्वरूपात देता येणार नसल्याचे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले होते. त्यामुळे जानेवारी महिन्याचा हप्ता आधी देण्यास मनाई करण्यात आली होती. परिणामी, डिसेंबर महिन्याचा नियमित 1500 रुपयांचा हप्ता आता लाभार्थी महिलांच्या खात्यात वर्ग करण्यात आला आहे.
दरम्यान, मकर संक्रांतीपूर्वी डिसेंबर व जानेवारी असे एकत्रित 3000 रुपये मिळणार असल्याच्या बातम्या आणि सोशल मीडियावरील दाव्यांमुळे राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रारी दाखल झाल्या होत्या. याबाबतची वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी आयोगाने मुख्य सचिवांकडे स्पष्टीकरण मागितले होते.
मुख्य सचिवांनी सादर केलेल्या अहवालानुसार, निवडणूक जाहीर होण्यापूर्वी सुरू असलेल्या योजना आचारसंहितेच्या कालावधीत सुरू ठेवण्यास परवानगी आहे. मात्र, नवीन लाभार्थी निवडणे किंवा हप्ता अग्रिम स्वरूपात देणे नियमबाह्य ठरणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने लाडकी बहीण योजनेचा केवळ नियमित लाभ देण्यास मान्यता दिली आहे.
राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे. मतदानाच्या अवघ्या दोन दिवस आधी लाडक्या बहिणींच्या खात्यात 1500 रुपये जमा झाल्याने महिलांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. त्यामुळे आचारसंहितेमुळे अडचणीत आलेल्या लाडकी बहीण योजनेला अखेर दिलासा मिळाला आहे.

More Stories
शिरूर तालुक्यातील सविंदणे येथे क्रीडा शिक्षकाला घरात घुसून मारहाण; विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन करत केली कारवाईची मागणी…
आळेफाटा येथे पिकअप आणि बोलेरो यांच्यात भीषण अपघात; एक ठार, नऊ जखमी
बारावी विज्ञान शाखेचा फिजिक्स-केमिस्ट्री पेपर फुटला; नागपूरच्या सदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल