September 13, 2026

unfilteredtruth

unfilteredtruth

पुण्यात हिंसाचाराची वाढती छाया: कोथरूडमध्ये शाळकरी मुलावर, पर्वती पायथ्यावर तरुणांवर धारदार शस्त्राने हल्ला

पुण्यातील कोथरूड आणि पर्वती पायथा भागात शाळकरी मुलासह दोन नागरिकांवर तीक्ष्ण शस्त्राने हल्ला; पोलिसांकडून गुन्हे दाखल.

पुणे | प्रतिनिधी
पुण्यातील कोथरूड आणि पर्वती पायथा परिसरात वैयक्तिक वादातून झालेल्या दोन वेगवेगळ्या हिंसक घटनांनी परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनांमध्ये एका शाळकरी मुलासह दोन नागरिकांवर तीक्ष्ण शस्त्राने हल्ला करण्यात आला असून संबंधित प्रकरणांमध्ये पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.

कोथरूडमध्ये शाळकरी मुलावर हल्ला

कोथरूड भागात शाळेतील वादाचे गंभीर परिणाम दिसून आले. सतरा वर्षीय शाळकरी मुलावर दोन जणांनी तीक्ष्ण शस्त्राने वार केल्याची घटना १७ जानेवारी रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास स्वामी समर्थ मठ परिसरात घडली.
या प्रकरणी बलराम हनुमंत लोखंडे (वय २४, रा. सुतारदरा, कोथरूड) यांनी कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, त्यांचा लहान भाऊ कल्याण हा दहावीत शिक्षण घेत असून, शाळेतील जुन्या वादातून आरोपींनी त्याला अडवून शिवीगाळ व मारहाण केली. त्यानंतर त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला.

घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप देशमाने यांनी घटनास्थळी भेट दिली. सध्या आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. पोलीस उपनिरीक्षक काळे या प्रकरणाचा तपास करत आहेत.

पर्वती पायथा परिसरात टोळक्याचा प्राणघातक हल्ला

दुसरी घटना पर्वती पायथा येथील जनता वसाहत परिसरात घडली. वैमनस्यातून दहा ते बारा जणांच्या टोळक्याने दोन तरुणांवर तीक्ष्ण शस्त्राने हल्ला केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या हल्ल्यात मुकेश नामदेव पोटे (वय ४२) आणि त्यांचा मित्र जखमी झाले आहेत.

मुकेश पोटे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, रविवारी मध्यरात्री सव्वाबाराच्या सुमारास वाघजाई मित्र मंडळाजवळ जुन्या वादातून आरोपींनी वाद घालून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व नंतर धारदार शस्त्राने वार केले.
या प्रकरणी सुमीत पवार, विजय हुलावळे, निलेश पवार, भैय्या पवार, किरण पवार यांच्यासह पाच ते सहा जणांविरुद्ध पर्वती पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक बी. एम. माळी पुढील तपास करत आहेत.

Spread the love

You may have missed