
शिरूर तालुक्यातील सविंदणे गावात क्रीडा शिक्षकावर झालेल्या मारहाणीच्या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. मंगळवारी (दि. २४) रात्री क्रीडा शिक्षक नितीन चव्हाण यांना काही अज्ञात व्यक्तींनी घरातून जबरदस्तीने बाहेर नेऊन गावातील मुख्य चौकात मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, चव्हाण हे घरी असताना दहा ते पंधरा जणांचा गट त्यांच्या निवासस्थानी घुसला. त्यांनी त्यांना ओढत नेऊन चौकात लाथाबुक्क्यांनी तसेच काठ्या-दांडक्यांनी मारहाण केली. काही जणांच्या हातात धारदार शस्त्रे असल्याचेही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या प्रकारामुळे गावात भीती आणि संतापाचे वातावरण पसरले.
घटनेच्या निषेधार्थ बुधवारी सकाळी शाळेतील विद्यार्थ्यांनी आणि ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन सुरू केले. “आमच्या शिक्षकांना न्याय मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही,” अशी भूमिका विद्यार्थ्यांनी मांडली. हातात फलक घेऊन घोषणाबाजी करत त्यांनी निषेध नोंदवला. पालकांचाही आंदोलनात सहभाग होता.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांनी नागरिकांशी संवाद साधून सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. संबंधितांवर तातडीने गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी आंदोलकांनी केली. सुमारे चार तास सुरू असलेले आंदोलन पोलिसांच्या आश्वासनानंतर स्थगित करण्यात आले.
या प्रकरणी उशिरापर्यंत गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती. घटनेचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू असून, शिक्षकांच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

More Stories
नसरापूर प्रकरणानंतर पुण्यातील पर्वती भागात ९ वर्षीय मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न…
नसरापूरमध्ये ४ वर्षीय चिमुरडीवर अत्याचारानंतर खून; आरोपी ताब्यात, संतप्त ग्रामस्थांचा पुणे–सातारा महामार्गावर रास्ता रोको
लाणी काळभोरमध्ये महात्मा ज्योतिराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती उत्साहात साजरी…