May 8, 2026

unfilteredtruth

unfilteredtruth

पुण्यात काळजाचा थरकाप उडवणारी घटना ! आईकडून पोटच्या मुलीचा गळा दाबून मुलासह आईने विहिरीत मारली उडी, मुलाचा दुर्दैवी अंत

मंचर (पुणे), दि. ३ : आंबेगाव तालुक्यातील मंचर येथे शुक्रवारी सकाळी हृदय पिळवटून टाकणारी घटना उघडकीस आली. कौटुंबिक वादाच्या पार्श्वभूमीवर एका विवाहित महिलेने आपल्या १४ वर्षीय मुलीचा गळा दाबण्याचा प्रयत्न केल्यानंतर सहा वर्षांच्या मुलाला सोबत घेऊन विहिरीत उडी घेतल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेत सहा वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला असून आई आणि मुलगी गंभीर जखमी अवस्थेत उपचार घेत आहेत.

नेहाल आशिष बाणखेले (वय ६) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. तर परिज्ञा आशिष बाणखेले (वय १४) ही मुलगी गंभीर जखमी असून हर्षदा आशिष बाणखेले (वय ३५) या महिलेलाही दुखापत झाली आहे. दोघींवर मंचर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ही घटना सकाळी सुमारे सव्वा आठच्या सुमारास तपनेश्वर स्मशानभूमीजवळ घडली. विहिरीत पडल्याचा आवाज ऐकून स्थानिक नागरिक तत्काळ घटनास्थळी धावले. नगरपंचायतीचे पदाधिकारी व स्थानिक नागरिकांनी मदतकार्य सुरू करत विहिरीत उतरून महिला आणि मुलाला बाहेर काढले.

जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी नेहाल याला मृत घोषित केले. दरम्यान, मुलगी परिज्ञा घरात आढळून आल्याने तिलाही उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले. प्राथमिक तपासात तिचा गळा दाबण्याचा प्रयत्न झाल्याचे समोर आले आहे.

घटनेची माहिती मिळताच मंचर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीकांत कंकाळ व त्यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत असून पोलिस पुढील तपास करत आहेत.

प्राथमिक माहितीनुसार, संबंधित महिला गेल्या काही वर्षांपासून कौटुंबिक कारणांमुळे स्वतंत्र राहत होती. या प्रकरणी पतीकडून तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

Spread the love