May 15, 2026

unfilteredtruth

unfilteredtruth

पिंपरी-चिंचवड हादरले: सुरक्षा रक्षकाकडून चिमुकल्या मुलींचा विनयभंग; १० वर्षांच्या मुलीच्या धाडसामुळे नराधम अटकेत…

पिंपरी-चिंचवड: शहरातील एका उच्चभ्रू गृहनिर्माण संस्थेत (Housing Society) रक्षणकर्त्यानेच भक्षक बनल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. चार अल्पवयीन मुलींचा विनयभंग करणाऱ्या एका ४५ वर्षीय सुरक्षा रक्षकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. एका १० वर्षांच्या चिमुरडीने दाखवलेल्या प्रसंगावधान आणि धाडसामुळे हा गंभीर प्रकार उघडकीस आला.

नेमकी घटना काय?

​मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी सोसायटीचा परिसर शांत असताना आरोपी दिनेश चौधरी याने ८ ते १० वर्ष वयोगटातील चार मुलींना गाठले. टेरेसवरील पाण्याची टाकी दाखवतो, असे आमिष दाखवून तो या मुलींना सातव्या मजल्यावर घेऊन गेला. तिथे त्याने या मुलींशी अश्लील चाळे करून त्यांचा विनयभंग केला. इतकेच नव्हे तर, “याबाबत कोणाला काही सांगितले तर जीवे मारीन,” अशी धमकी देऊन त्याने मुलींना घाबरवण्याचा प्रयत्न केला.

मुलीचे कौतुकास्पद धाडस

​आरोपीच्या धमकीमुळे सर्व मुली प्रचंड घाबरल्या होत्या. मात्र, यातील १० वर्षांच्या मुलीने न डगमगता घरी पोहचताच आपल्या आईला घडलेला सर्व प्रकार सविस्तर सांगितला. घटनेचे गांभीर्य ओळखून पालकांनी तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार नोंदवली.

आरोपीला तात्काळ बेड्या

​पालकांच्या तक्रारीनंतर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी वेगाने हालचाली करत आरोपी दिनेश चौधरी याला अटक केली आहे. त्याच्यावर पोक्सो (POCSO) कायद्यांतर्गत आणि इतर संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे उच्चभ्रू सोसायट्यांमधील महिला आणि मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून परिसरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

Spread the love