July 29, 2026

unfilteredtruth

unfilteredtruth

यवत पोलिसांची धडाकेबाज कारवाई; बेकायदेशीर गावठी पिस्तुल बाळगणाऱ्या तरूणाला अटक

पुणे (यवत प्रतिनिधी: प्रीतम सावंत): यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेकायदेशीररित्या गावठी पिस्तुल बाळगणाऱ्या एका तरूणाला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून एक गावठी पिस्तुल आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे. ही धडाकेबाज कारवाई २३ जून रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास भुलेश्वर रस्त्यावर करण्यात आली.

​आदित्य सर्जेराव सांगळे (वय २१ वर्षे, रा. दत्तनगर, पाटस, ता. दौंड, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

​अशी झाली कारवाई:

​मिळालेल्या माहितीनुसार, भुलेश्वर फाटा ते भुलेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर एक व्यक्ती विनापरवाना शस्त्र बाळगून फिरत असल्याची गोपनीय माहिती यवत पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांच्या पथकाने तातढीने घटनास्थळी धाव घेत तपासणी केली. यावेळी आरोपी आदित्य सांगळे हा संशयास्पदरित्या आढळून आला. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे विनापरवाना गावठी पिस्तुल आणि जिवंत काडतूस सापडले.

​सध्या पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात शस्त्र बाळगण्यास मनाई करण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी आणि बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी पोलीस हवालदार संदीप देवकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियम (आर्म्स ऍक्ट) आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमानुसार यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

>”यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांविरोधात पोलिसांची कडक मोहीम अशीच पुढेही सुरू राहील आणि दोषींवर कडक कारवाई केली जाईल.”— संतोष तासगावकर (पोलीस निरीक्षक, यवत पोलीस स्टेशन)>

​सदरची कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गील, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी बापुराव दडस यांच्या मार्गदर्शनाखाली यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर, पोलीस उपनिरीक्षक मारोती मेतलवाड आणि त्यांच्या पथकाने केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मेतलवाड करत आहेत.

Spread the love