July 29, 2026

unfilteredtruth

unfilteredtruth

पुणे: टिळेकरवाडीतून अल्पवयीन मुलीचे अपहरण; आईच्या मोबाईलवर आला ‘Sorry Mummy’ चा मेसेज, नात्यातीलच भावावर गुन्हा दाखल…

पुणे उरुळी कांचन (प्रतिनिधी: प्रीतम सावंत): पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील टिळेकरवाडी परिसरातून एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. घरातून ‘ज्युस’ आणण्यासाठी बाहेर पडलेली ही मुलगी परतलीच नाही. विशेष म्हणजे, या घटनेनंतर मुलीच्या आईच्या मोबाईलवर एका अज्ञात नंबरवरून ‘Sorry Mummy’ असा इंग्रजीत मेसेज आला आहे. याप्रकरणी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, लिंगेष गोरखनाथ सोनकांबळे (वय अंदाजे, रा. नात्यातील चुलत चुलत भाऊ) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीच्या आईने उरुळी कांचन पोलीस ठाण्यात अधिकृत फिर्याद दिली आहे.

नेमकी घटना काय?

​फिर्यादी महिला आणि त्यांचे कुटुंब टिळेकरवाडी परिसरात शेतात मजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात. गुरुवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास हे दाम्पत्य शेतात काम करत होते. त्याच वेळी त्यांच्या लहान मुलीने फोन करून सांगितले की, मोठी बहीण (अल्पवयीन मुलगी) दुपारी एक वाजता ‘ज्युस’ आणायला जाते असे सांगून घरातून निघून गेली आहे, मात्र ती अद्याप परतलेली नाही.

​घटनेचे गांभीर्य ओळखून आई-वडिलांनी तात्काळ घर गाठले. त्यांनी टिळेकरवाडी, खामगाव टेक, उरुळी कांचन गाव आणि सर्व नातेवाईकांकडे मुलीचा कसून शोध घेतला, मात्र तिचा कुठेही पत्ता लागला नाही.

रात्री आला ‘Sorry Mummy’ चा मेसेज

​मुलीचा शोध सुरू असतानाच, त्याच रात्री सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास मुलीच्या आईच्या मोबाईलवर एका अनोळखी नंबरवरून ‘Sorry Mummy’ असा व्हॉट्सॲप किंवा टेक्स्ट मेसेज आला. यामुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.

​आई आणि नातेवाईकांनी तात्काळ त्या मोबाईल नंबरची खात्री केली असता, तो नंबर त्यांच्याच नात्यातील चुलत भाऊ लिंगेष सोनकांबळे याचा असल्याचे समोर आले. लिंगेष यानेच मुलीला कशाचे तरी आमिष दाखवून, फूस लावून कायदेशीर पालकांच्या संमतीशिवाय पळवून नेल्याचा संशय आईने फिर्यादीत व्यक्त केला आहे.

पोलीस तपास सुरू

​अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याप्रकरणी उरुळी कांचन पोलिसांनी या प्रकरणाची कडक दखल घेतली असून गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस सहाय्यक फौजदार मत्रे करत असून, पोलीस मुलीचा आणि संशयित आरोपीचा शोध घेत आहेत.

Spread the love