July 29, 2026

unfilteredtruth

unfilteredtruth

पुणे: कॅम्प परिसरातील कपड्यांचे दुकान फोडणारे दोन चोर गजाआड; लष्कर पोलिसांकडून २.८५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत…

पुणे: पुण्यातील कॅम्प भागातील प्रसिद्ध एम जी रोडवर असलेल्या एका कपड्यांच्या दुकानात घरफोडी करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना लष्कर पोलिसांनी अत्यंत शिताफीने अटक केली आहे. आरोपींकडून चोरीला गेलेली रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेली वाहने असा एकूण २,८५,१०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

​याप्रकरणी पोलिसांनी अभिषेक राम कुमार (वय १९, रा. गंगाधाम, मार्केटयार्ड, पुणे) आणि सचिन प्रताप परिहार (वय २०, रा. बिबवेवाडी, पुणे) या दोघांना बेड्या ठोकल्या आहेत.

नेमकी घटना काय?

​मिळालेल्या माहितीनुसार, एम जी रोड कॅम्प येथे ‘इंन्टस्टाईल मेन्स अँड किडस’ (Instyle Mens & Kids) नावाचे कपड्यांचे दुकान आहे. ३० जून २०२६ रोजी रात्री हे दुकान बंद असताना आरोपींनी दुकानाच्या खिडकीचे ग्रील उचकटून आत प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी कॅश काउंटरमधून तब्बल १,७०,००० रुपयांची रोख रक्कम चोरून पोबारा केला होता. याप्रकरणी लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तांत्रिक तपासाच्या आधारे अटक

​गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून लष्कर पोलीस स्टेशनच्या तपास पथकातील अधिकारी आणि अंमलदारांनी तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे तपास सुरू केला. तपासादरम्यान वरील दोन्ही आरोपींनीच ही चोरी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून १ जुलै २०२६ रोजी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले.

लाखांचा मुद्देमाल जप्त

​पोलिसांनी आरोपींकडे कसून चौकशी केली असता त्यांनी या घरफोडीची कबुली दिली. त्यांच्याकडून चोरीच्या रकमेतील १,६५,१०० रुपये रोख आणि गुन्ह्यात वापरलेल्या १,२०,००० रुपये किमतीच्या दोन दुचाकी वाहने असा एकूण २,८५,१०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उप-निरीक्षक राहुल घाडगे करत आहेत.

या पथकाने केली कारवाई

​सदरची उल्लेखनीय कामगिरी अपर पोलीस आयुक्त (पश्चिम प्रादेशिक विभाग) श्री. मनोज पाटील, पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ ०५) श्रीमती राजलक्ष्मी शिवणकर, सहाय्यक पोलीस आयुक्त (लष्कर विभाग) श्रीमती संगिता शिंदे अल्फान्सो यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

​तसेच लष्कर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री युवराज हांडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. गजानन चोरमले यांच्या सूचनेनुसार पोलीस उप-निरीक्षक राहुल घाडगे, तपास पथकाचे पोलीस अंमलदार अतुल मेंगे, संदीप उकिरडे, शरद मारणे, प्रवीण गायकवाड, विजय कुंभार, सागर हराळ, लोकेश कदम, अमोल कोडीलकर व पारसे यांनी ही यशस्वी कारवाई केली. 

Spread the love