September 13, 2026

unfilteredtruth

unfilteredtruth

आषाढी वारीत माणुसकीचे दर्शन! DCP डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी फिट आलेल्या वारकऱ्याला दिले तातडीने उपचार, वाचवले प्राण…

पुणे, प्रतिनिधी : आषाढी वारीदरम्यान पुणे शहरात माणुसकीचे आणि कर्तव्यदक्षतेचे दर्शन घडवणारी घटना समोर आली आहे. पुणे शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त (DCP) डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी अचानक फिट येऊन रस्त्यावर कोसळलेल्या एका वारकऱ्याला प्रसंगावधान राखत तातडीने प्राथमिक उपचार करून त्याचे प्राण वाचवले.

मिळालेल्या माहितीनुसार, पालखी सोहळ्यादरम्यान संबंधित वारकरी अचानक बेशुद्ध होऊन खाली पडला. त्याला फिट आल्याचे लक्षात येताच घटनास्थळी उपस्थित असलेल्या डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी कोणतीही वेळ न दवडता धाव घेतली. त्यांनी वैद्यकीय ज्ञानाचा उपयोग करून वारकऱ्याला आवश्यक प्राथमिक उपचार दिले आणि त्याची प्रकृती स्थिर ठेवण्यासाठी प्रयत्न केले.

त्यानंतर तात्काळ वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्यात आली. योग्य वेळी मिळालेल्या उपचारांमुळे वारकऱ्याचा जीव वाचल्याची माहिती समोर आली आहे.

या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, डॉ. भाजीभाकरे यांच्या तत्परतेचे आणि संवेदनशीलतेचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. पोलीस अधिकारी म्हणून कायदा-सुव्यवस्था सांभाळण्याबरोबरच मानवतेची जपणूक करत त्यांनी दाखविलेली तत्परता अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

आषाढी वारीसारख्या लाखो भाविकांच्या उपस्थितीतील मोठ्या धार्मिक सोहळ्यात आपत्कालीन परिस्थितीत दाखविलेल्या या कार्यामुळे पुणे शहर पोलिसांच्या सेवाभावी भूमिकेची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.

Spread the love

You may have missed