
पुणे, लोणी काळभोर (प्रतिनिधी: विशाल सानप): लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीत सुरू असलेल्या ऑनलाईन मटका जुगारावर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. बौद्ध वस्ती परिसरात बेकायदेशीरपणे मोबाईलच्या माध्यमातून ‘कल्याण मटका’ जुगार चालवणाऱ्या रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला असून, या प्रकरणी दोघा जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून मोबाईल आणि सिमकार्डसह एकूण २३,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
घटनेची सविस्तर माहिती:
३ ऑगस्ट २०२६ रोजी लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार सचिन भिमराव सोनवणे यांना पेट्रोलिंग दरम्यान गोपनीय माहिती मिळाली होती की, बौद्ध वस्ती परिसरातील एका झाडाच्या आडोशाला काही तरुण मोबाईलवर ऑनलाईन जुगार खेळत आहेत. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ कारवाई करत घटनास्थळी छापा टाकला.
पोलिसांनी तपासादरम्यान खालील आरोपींना ताब्यात घेतले:
- स्वप्नील शांताराम भालेराव (वय २९, रा. बौद्धवस्ती, लोणी काळभोर, ता. हवेली, जि. पुणे)
- मयूर गोपीचंद बडदे (वय २४, रा. अंबरनाथ मंदिराच्या बाजूला, लोणी काळभोर, ता. हवेली, जि. पुणे)
- सुरज काजणे (वय २५, रा. हडपसर, पुणे) – (फरार असलेला आरोपी)
गुन्ह्याची पद्धत:
आरोपी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी मोबाईलचा वापर करून ऑनलाईन ‘कल्याण मटका’ जुगार खेळत व खेळवत असल्याचे तपासात निष्पन्न झाले. आरोपी स्वप्नील हा ऑनलाईन आकडे घेऊन मयूर बडदे याला पाठवायचा आणि मयूर हा ते आकडे व्हॉट्सॲपच्या माध्यमातून मुख्य आरोपी सुरज काजणे याच्याकडे पाठवून जुगार चालवत होता.
जप्त करण्यात आलेला मुद्देमाल:
- स्वप्नील भालेराव कडून: १०,००० रुपये किमतीचा काळ्या रंगाचा विवो कंपनीचा मोबाईल (संत्र्यात एअरटेल व जिओचे सिमकार्ड).
- मयूर बडदे कडून: १३,००० रुपये किमतीचा फिकट हिरव्या रंगाचा रेडमी कंपनीचा मोबाईल (संत्र्यात व्होडाफोनचे सिमकार्ड).
पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम कलम १२ (अ) तसेच भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या (BNSS) कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश पैठणे व लोणीकाळभोर पोलीस ठाण्याचे पथक करत आहे.

More Stories
पुणे : सामाजिक कार्यकर्त्या स्मिता नॉर्टन यांचे निधन; महिला व वंचितांच्या प्रश्नांसाठी कायम राहिल्या पुढे…
पुणे: कर्जाचा डोंगर अन् शेतातील नुकसान; MPSC ची तयारी करणाऱ्या तरुणाची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये व्यथा उघड…
पुणे: लोणी काळभोर पोलीस ठाण्यात एसीबीचा छापा; लाचखोर सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर रंगेहाथ जाळ्यात…