
पुणे : शहर परिसरातील घरफोडीच्या घटनांना आळा घालण्यात विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या तपास पथकाला मोठे यश आले असून, पोलिसांनी आंतरराज्यीय स्तरावर गुन्हे करणाऱ्या एका कुख्यात टोळीला जेरबंद केले आहे. या धडक कारवाईत आरोपींकडून तब्बल ३७ लाख रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने हस्तगत करण्यात आले असून, या कारवाईमुळे पुणे शहरातील विविध पोलीस ठाण्यांमधील एकूण ९ गंभीर गुन्हे उघडकीस आले आहेत.
विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत फिर्यादी घरी नसताना घराचा दरवाजा तोडून चोरी झाल्याची घटना घडली होती (गुरनं १२६/२०२६). या गुन्ह्याचा गांभीर्याने तपास करण्याचे आदेश वरिष्ठ पोलीस निरीक्षक नवनाथ जगताप यांनी तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक उमेश कारके यांना दिले होते. त्यानुसार तपासाची दिशा ठरवत असताना, तपास पथकातील पोलीस हवालदार नितीन मुंढे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, या गुन्ह्यातील संशयित आरोपी उंड्री-पिसोळी परिसरात येणार आहेत. या माहितीच्या आधारे सहायक पोलीस निरीक्षक उमेश कारके व त्यांच्या पथकाने उंड्री-पिसोळी परिसराचा ताबा घेत परिसर पिंजून काढला. आरोपी दुचाकीवरून डोंगराच्या रस्त्याने येत असल्याची खात्री पटताच पोलिसांनी सापळा रचून त्यांना चारही बाजूंनी घेराव घातला आणि शिताफीने ताब्यात घेतले.
ताब्यात घेण्यात आलेल्या सराईत आरोपींकडे कसून चौकशी केली असता त्यांनी पुणे शहरात घरफोडी केल्याची कबुली दिली. शंकरसिंग ऊर्फ कुणालसिंग जितेंद्रसिंग जुनी (वय २७, रा. रामटेकडी, हडपसर, पुणे), रणबीरसिंग धनसिंग बावरी शिकलीगर (वय २६, रा. बडोदा, गुजरात), अक्षयसिंग ऊर्फ अक्षय बिरुसिंग जुनी (वय २२, रा. हडपसर, पुणे) आणि सोनुसिंग शाखासिंग शिकलीगर / तीलपिटीया (वय २२, रा. बडोदा, गुजरात) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. सखोल चौकशीदरम्यान त्यांनी विश्रामबाग, विश्रांतवाडी, काळेपडळ आणि दत्तवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडीचे एकूण ९ गुन्हे (गुरनं १२६/२०२६, २२८/२०२६, ३६८/२०२६, ४९९/२०२५, २६/२०२६, ३०७/२०२२, ११०/२०२६, १११/२०२६ आणि ११३/२०२६) केल्याचे निष्पन्न झाले असून, त्यांच्याकडून जवळपास ३७ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची अत्यंत महत्त्वाची व यशस्वी कामगिरी मा. अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग श्री. राजेश बनसोडे, पोलीस उप-आयुक्त परिमंडळ-०१ श्री. हृषिकेश रावले, सहायक पोलीस आयुक्त श्रीमती अनुजा देशमाने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. नवनाथ जगताप, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. विकास भिंगारदिवे, आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. रमेश लाहिगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तपास पथकातील सहायक पोलीस निरीक्षक उमेश कारके, ग्रेड पोलीस उपनिरीक्षक मेहबुब मोकाशी, तसेच पोलीस अंमलदार सचिन कदम, नितीन मुंढे, अमोल भोसले, महेश कदम, शशिकांत दरेकर, शैलेश सुर्वे, सचिन अहिवळे, कैलास डुकरे, जाकीर मणियार, अनिस शेख, शिवा गायकवाड, अर्जुन थोरात, सागर मोरे, फिरोज इनामदार व नितीन बाबर यांनी या कारवाईत सहभाग घेतला होता.

More Stories
पुणे : सामाजिक कार्यकर्त्या स्मिता नॉर्टन यांचे निधन; महिला व वंचितांच्या प्रश्नांसाठी कायम राहिल्या पुढे…
पुणे: कर्जाचा डोंगर अन् शेतातील नुकसान; MPSC ची तयारी करणाऱ्या तरुणाची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये व्यथा उघड…
पुणे: लोणी काळभोर पोलीस ठाण्यात एसीबीचा छापा; लाचखोर सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर रंगेहाथ जाळ्यात…