September 12, 2026

unfilteredtruth

unfilteredtruth

पुणे : सामाजिक कार्यकर्त्या स्मिता नॉर्टन यांचे निधन; महिला व वंचितांच्या प्रश्नांसाठी कायम राहिल्या पुढे…

लोणी काळभोर : सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय असलेल्या स्मिता विजय नॉर्टन यांचे शुक्रवारी (11 सप्टेंबर) पहाटे अडीचच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले. त्या 52 वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनाने कदमवाकवस्ती, लोणी काळभोर तसेच परिसरातील सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात शोक व्यक्त होत आहे.

स्मिता नॉर्टन या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ग्राहक संरक्षण समितीच्या माजी सरचिटणीस आणि महिला उपाध्यक्षा म्हणून कार्यरत होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या त्या निकटवर्तीय असल्याचेही सांगितले जाते.

लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या दक्षता समितीच्या सदस्या म्हणूनही त्यांनी काम केले. या माध्यमातून महिलांच्या कौटुंबिक तसेच सामाजिक समस्यांमध्ये हस्तक्षेप करून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. परिसरात त्या आपुलकीने ‘नॉर्टन ताई’ म्हणून परिचित होत्या.

गोरगरीब, वंचित आणि तळागाळातील नागरिकांच्या प्रश्नांसाठी त्या सातत्याने आवाज उठवत. विविध सामाजिक उपक्रम आणि आंदोलनांमध्ये त्यांचा सहभाग राहिला. विशेषतः महिलांशी संबंधित प्रश्नांवर त्या सक्रियपणे काम करत होत्या.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रकृती अचानक बिघडल्याने नॉर्टन यांना मागील चार दिवसांपासून लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान शुक्रवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली.

त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी आणि सून असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास फातिमानगर येथील इंडियन ख्रिश्चन सिमेट्री येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Spread the love

You may have missed