October 29, 2026

unfilteredtruth

unfilteredtruth

पुण्यात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर परिमंडळ-३ कडून रूट मार्च…

PUNE : गणेशोत्सव २०२६ उत्साहपूर्ण, शांततामय आणि सुरक्षित वातावरणात पार पडावा, तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पुणे शहर पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. याच पार्श्वभूमीवर परिमंडळ-३ अंतर्गत कोथरूड, अलंकार आणि वारजे पोलीस ठाण्यांच्या हद्दीत पोलिसांनी रूट मार्च काढला.

पोलीस उपआयुक्त सागर कवडे यांच्या अधिपत्याखाली झालेल्या या रूट मार्चमध्ये २ सहायक पोलीस आयुक्त, ७ वरिष्ठ पोलीस निरीक्षक, २२ सहाय्यक पोलीस निरीक्षक/पोलीस उपनिरीक्षक, १२० पोलीस अंमलदार तसेच राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक-२ ची एक प्लाटून सहभागी झाली.

गणेशोत्सव विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची सज्जता आणि सतर्कता नागरिकांना दिसावी, तसेच संवेदनशील ठिकाणी अनुचित प्रकारांना प्रतिबंध करता यावा, या उद्देशाने संरक्षणात्मक साधनसामग्रीसह रूट मार्च करण्यात आला. यावेळी प्रमुख चौक, सार्वजनिक ठिकाणे, गणेश मंडळांचा परिसर, गर्दीची ठिकाणे आणि संवेदनशील भागांची पाहणी करण्यात आली.

या रूट मार्चला कोथरूड पोलीस ठाण्यापासून सुरुवात झाली. मुठेश्वर चौक, संगम चौक, भेलकेनगर चौक, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, कोथरूड स्टँड परिसर, सिग्नल, कोकण एक्सप्रेस चौक, गोसावी वस्ती, कॅनल रोड, विकास चौक, कर्वेनगर ब्रिज, डी-मार्ट आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक या मार्गावरून रूट मार्च काढण्यात आला.

गणेशोत्सव काळात वाढणारी नागरिकांची गर्दी, गणेश मंडळांचे कार्यक्रम, विसर्जन मिरवणुका आणि वाहतुकीची वाढती वर्दळ लक्षात घेऊन कायदा व सुव्यवस्था, वाहतूक नियंत्रण आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

गणेशोत्सव विसर्जन शांततामय आणि सुरक्षित वातावरणात पार पाडण्यासाठी परिमंडळ-३ अंतर्गत पोलीस अधिकारी व अंमलदार सतर्क असून पोलीस प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याचे पोलीस उपआयुक्त सागर कवडे यांनी सांगितले. तसेच नागरिकांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पुणे शहर पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

Spread the love