October 26, 2026

unfilteredtruth

unfilteredtruth

नागपुरात नगरसेवकाच्या घरावरील गोळीबार प्रकरणात सात आरोपींवर मोक्का…

नागपूर (प्रतिनिधी : प्रकाश वाघमारे): भांडेवाडी परिसरातील काँग्रेसचे नगरसेवक शुभम मोटघरे यांच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणात पोलिसांनी सात आरोपींविरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई केली आहे. या प्रकरणात फल्ली टोळीचा सहभाग समोर आला असून, टोळीचा कथित म्होरक्या विशाल उर्फ फल्ली गुप्ता याच्यासह काही आरोपी अद्याप फरार आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ ऑगस्टच्या रात्री श्रावणनगर येथील नगरसेवक शुभम मोटघरे यांच्या घरावर गोळीबार करण्यात आला होता. घराच्या वरच्या मजल्यावरील गॅरेजमध्ये आवाज आल्यानंतर सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यामध्ये दुचाकीवरून जाणारे दोन तरुण दिसून आले. दुचाकीवर मागे बसलेल्या तरुणाने घराच्या गॅलरीच्या दिशेने गोळी झाडल्याचा आरोप आहे.

या घटनेप्रकरणी भांडेवाडी पोलिसांनी खुनाचा प्रयत्न आणि अन्य संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर पोलीस आयुक्तांच्या आदेशाने तपास गुन्हे शाखेच्या युनिट-५ कडे सोपवण्यात आला. तपासादरम्यान पोलिसांनी सात आरोपींना अटक केली.

पोलीस तपासानुसार, विशाल उर्फ फल्ली गुप्ता याने आपल्या साथीदारांना गोळीबार करण्याची सुपारी दिल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणातील सातही अटक आरोपींविरोधात आता मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली असून, ते नागपूर मध्यवर्ती कारागृहात आहेत.

दरम्यान, विशाल उर्फ फल्ली गुप्ता याच्यासह इतर काही आरोपी अद्याप फरार आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे. या कारवाईमुळे नागपुरातील संघटित गुन्हेगारीशी संबंधित प्रकरणातील तपासाला महत्त्व प्राप्त झाले आहे.

Spread the love