पुणे महानगरपालिका निवडणुकीआधी राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांवर प्रशांत जगतापांनी तीव्र विरोध करत पक्षातून राजीनामा देण्याचा इशारा दिला आहे.

Pune Election 2026: राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांना प्रशांत जगतापांचा तीव्र विरोध
पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी अजित पवार गट, शरद पवार गट आणि काँग्रेस पक्ष एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजपला (BJP) आव्हान देण्यासाठी महाविकास आघाडीच्या (MVA) माध्यमातून एकत्रित रणनीती आखली जात असल्याची चर्चा आहे. मात्र, या संभाव्य एकत्रीकरणाला शरद पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सुरुवातीपासूनच तीव्र विरोध दर्शवला आहे.
“दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर माझा राजीनामा तयार”
प्रशांत जगताप यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “आज जर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याची घोषणा झाली, तर मी फक्त शहराध्यक्षपदाचाच नव्हे, तर पक्षाच्या सदस्यत्त्वाचाही राजीनामा देईन.” त्यांच्या या भूमिकेमुळे पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
“अजित पवारांसोबत युती केल्यास पक्षाचे नुकसान”
जगताप म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर आपण पुण्यात शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्ष नव्याने उभा केला. आगामी महानगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र लढल्यास शरद पवार गटाला फायदा होईल. मात्र, अजित पवार गटासोबत युती केल्यास पक्षाचे आणि कार्यकर्त्यांचे नुकसान होईल, असा दावा त्यांनी केला.
“निवडणुकीच्या तोंडावर युती म्हणजे कार्यकर्त्यांचे मरण”
निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा अजित पवार यांच्याशी युती केल्यास कार्यकर्त्यांचे मनोबल खच्ची होईल, असे सांगत प्रशांत जगताप यांनी स्पष्ट केले की, अशा परिस्थितीत आपण पक्षात राहणार नाही. सध्या आपण राजीनामा दिलेला नसला तरी, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास निर्णय अटळ असल्याचे त्यांनी सांगितले.
मुंबईत महत्त्वाची बैठक, निर्णयाकडे सर्वांचे लक्ष
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची आज दुपारी 12 वाजता मुंबईत महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीला पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे, मुंबई अध्यक्षा राखी जाधव आणि प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे उपस्थित राहणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्या वतीने आलेल्या प्रस्तावावर आजच निर्णय घेऊन तो कळवला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
पुढील काही तास निर्णायक
दोन्ही पक्षांमध्ये अद्याप चर्चा सुरू असून संवादातून योग्य मार्ग निघेल, असा विश्वास शरद पवार गटाने व्यक्त केला आहे. मात्र, प्रशांत जगताप यांच्या आक्रमक भूमिकेमुळे पुण्यातील राजकीय समीकरणे कोणत्या दिशेने वळणार, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

More Stories
शिरूर तालुक्यातील सविंदणे येथे क्रीडा शिक्षकाला घरात घुसून मारहाण; विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन करत केली कारवाईची मागणी…
आळेफाटा येथे पिकअप आणि बोलेरो यांच्यात भीषण अपघात; एक ठार, नऊ जखमी
बारावी विज्ञान शाखेचा फिजिक्स-केमिस्ट्री पेपर फुटला; नागपूरच्या सदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल