पुण्यात अटक करण्यात आलेल्या जुबेर हंगरगेकरचे अफगाणिस्तान व हाँगकाँगमधील दहशतवादी नेटवर्कशी संबंध उघड. ATS तपासात धक्कादायक भारतविरोधी संभाषणांचा पर्दाफाश.

पुणे : कोंढवा परिसरातून अटक करण्यात आलेल्या संशयित दहशतवादी जुबेर हंगरगेकरच्या प्रकरणात तपास यंत्रणांना धक्कादायक माहिती हाती लागली आहे. महाराष्ट्र ATS च्या तपासानुसार जुबेरचे अफगाणिस्तान आणि हाँगकाँगमध्ये सक्रिय असलेल्या आंतरराष्ट्रीय दहशतवादी घटकांशी थेट संपर्क होते. त्याच्या मोबाईलमधून भारतविरोधी आशयाची अनेक संभाषणे मिळून आली असून, ही संभाषणे परदेशात बसलेल्या व्यक्तींशी झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
तपासात जुबेरच्या टेलीग्राम नेटवर्कमधील 102 आयडी समोर आले असून, त्यापैकी चार आयपी अॅड्रेस निष्पन्न झाले आहेत. या चारपैकी तीन आयपी अॅड्रेस अफगाणिस्तानमधील, तर एक आयपी अॅड्रेस हाँगकाँगमधील असल्याची माहिती ATS ने न्यायालयात सादर केली आहे. या डिजिटल पुराव्यांमुळे जुबेरचे आंतरराष्ट्रीय दहशतवादी मॉड्यूल्सशी संबंध अधिक ठोस झाले आहेत.
राष्ट्रविरोधी कारवायांमध्ये सहभाग असल्याच्या संशयावरून यापूर्वी न्यायालयीन कोठडीत असलेल्या जुबेर हंगरगेकरला ATS ने पुन्हा ताब्यात घेतले. त्याला शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात आले असता विशेष न्यायाधीश पी. वाय. लाडेकर यांनी 3 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी मंजूर केली.
जुबेर हा पुण्यातील एका खासगी आयटी कंपनीत कार्यरत असल्याचे समोर आले आहे. मात्र, तपासात तो कट्टर विचारधारेचा सक्रिय प्रचारक असल्याचा आरोप ATS कडून करण्यात आला आहे. तो ठाणे जिल्ह्यातील पडघा गावात वारंवार जात असून, तेथे तरुणांचे मानसिकदृष्ट्या कट्टरपंथीकरण करत असल्याचे तपासात उघड झाले आहे.
ATS च्या माहितीनुसार, जुबेर ‘खिलाफत’, ‘जिहाद’ आणि हिंसाचाराला धार्मिक स्वरूप देत तरुणांना भारतविरोधी विचारसरणीकडे वळवत होता. डिसेंबर 2023 मध्ये पडघा येथे पहाटे छापा टाकण्यात आला होता, मात्र कारवाईची चाहूल लागताच जुबेर फरार झाला होता. तब्बल दोन वर्षांनंतर त्याची अटक झाल्यानंतर या दहशतवादी नेटवर्कचे धागेदोरे हळूहळू उलगडू लागले आहेत.
तपासात भारताला ‘काफिर राष्ट्र’ ठरवून जिहाद हे धार्मिक कर्तव्य असल्याचा प्रचार केल्याचेही समोर आले आहे. पडघा परिसराला काही कट्टर घटकांकडून ‘ग्रेटर सीरिया’ असे संबोधले जात असल्याची बाब तपास यंत्रणांनी नमूद केली आहे. याच भागातून पूर्वी प्रशिक्षण घेतलेले काही जण देशातील विविध स्फोटांच्या घटनांमध्ये सहभागी असल्याची माहिती ATS कडे आहे.
जुबेरच्या संपर्कातील इतर संशयित व्यक्ती, त्यांचे डिजिटल व्यवहार आणि आंतरराष्ट्रीय दुवे तपासण्यासाठी पोलिस कोठडी आवश्यक असल्याचे सरकारी वकील राजेश कावेडिया यांनी न्यायालयात स्पष्ट केले. या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास ATS कडून सुरू आहे.

More Stories
लोणी काळभोरमधील सिद्राम मळा परिसरात चोरट्यांचा वावर; सीसीटीव्हीत तीन संशयित कैद, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
शिरूर तालुक्यातील सविंदणे येथे क्रीडा शिक्षकाला घरात घुसून मारहाण; विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन करत केली कारवाईची मागणी…
आळेफाटा येथे पिकअप आणि बोलेरो यांच्यात भीषण अपघात; एक ठार, नऊ जखमी