March 23, 2026

unfilteredtruth

unfilteredtruth

Pune Municipal Election Update : पुणे मनपा निवडणुकीत मोठा राजकीय उलटफेर; शरद पवार–अजित पवार राष्ट्रवादी एकत्र लढणार?

पुणे मनपा निवडणुकीत मोठा राजकीय ट्विस्ट! शरद पवार आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढणार? उद्या अधिकृत घोषणेची शक्यता.

पुणे :
पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. शरद पवार गट आणि अजित पवार गटाची राष्ट्रवादी काँग्रेस पुण्यातील मनपा निवडणूक एकत्र लढवण्याची शक्यता बळावली आहे. याबाबतची अधिकृत घोषणा सोमवारी होण्याची दाट शक्यता असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

यापूर्वी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, आता या भूमिकेत अचानक बदल होत राजकीय समीकरणांना नवे वळण मिळाले आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद पवार गटाच्या प्रमुख मागण्या अजित पवार यांनी मान्य केल्या आहेत. पुणे मनपाच्या निवडणुकीत अजित पवार गटाकडून शरद पवार यांच्या पक्षाला ३२ ते ३५ जागा देण्यावर सहमती झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर दोन्ही गटांनी एकत्र निवडणूक लढवण्यावर एकमत दर्शवले आहे.

पुणे शहरातील सर्व १६५ जागांवर ‘सिट टू सिट’ चर्चा पूर्ण झाल्याची माहिती असून, उद्या दुपारपर्यंत याबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, आज पुण्यात काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे गट) यांची जागावाटपाबाबत बैठक पार पडली. मात्र, या बैठकीला शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनुपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी वारंवार संपर्क साधूनही प्रतिसाद न मिळाल्याने काँग्रेस आणि ठाकरे गटाने सावध भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे.

या घडामोडींमुळे शरद पवार गट महाविकास आघाडीच्या जागावाटप चर्चेतून बाहेर पडला आहे का? असा सवालही राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे. पुणे मनपा निवडणुकीतील ही घडामोड राज्याच्या राजकारणात महत्त्वाची मानली जात आहे.

Spread the love