March 23, 2026

unfilteredtruth

unfilteredtruth

Pimpri Chinchwad Election: ‘अजित पवार’ नावाच्या उमेदवारामुळे पिंपरी-चिंचवडमध्ये राजकीय चर्चा; प्रभाग 25 मधून अर्ज दाखल

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत ‘अजित पवार’ नावाच्या उमेदवाराने प्रभाग 25 मधून अर्ज दाखल केल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. नेमकं काय आहे प्रकरण?

पिंपरी-चिंचवड:
पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक वेगळी आणि चर्चेची बाब समोर आली आहे. ‘अजित पवार’ नावाच्या उमेदवाराने प्रभाग क्रमांक 25 मधून महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे राजकीय वर्तुळात संभ्रम आणि उत्सुकता निर्माण झाली आहे.

प्रभाग क्रमांक 25 मधील ‘ड’ जागेसाठी अजित पोपट पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळ या निवडणूक चिन्हावर अर्ज दाखल केला आहे. अर्ज दाखल होताच अनेकांना हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित प्रकार असल्याचा भास झाला. मात्र, हा केवळ नावातील साधर्म्य असल्याचे स्पष्ट झाले आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे, अजित पोपट पवार यांनी अर्ज दाखल केला असला तरी त्यांना अद्याप राष्ट्रवादी काँग्रेसचा अधिकृत एबी फॉर्म मिळालेला नाही. एबी फॉर्म मिळाल्यासच ते शरद पवार–अजित पवार गटाच्या अधिकृत आघाडीचे उमेदवार ठरू शकतात. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीबाबत अंतिम चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.

नावातील साधर्म्यामुळे चर्चा

राज्यात सर्वपरिचित असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, तसेच प्रभाग 25 मधून अर्ज दाखल करणारे अजित पवार – या नावातील साम्यामुळे पिंपरी-चिंचवडमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून सोशल मीडियावरही याबाबत विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.

पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी एकत्र

दरम्यान, पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येणार असल्याची अधिकृत घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. पिंपरी-चिंचवड येथे झालेल्या सभेत बोलताना त्यांनी सांगितले की, घड्याळ आणि तुतारी हे दोन्ही चिन्ह एकत्रितपणे निवडणूक लढवणार आहेत.

“राष्ट्रवादी काँग्रेसचे कुटुंब पुन्हा एकत्र येत आहे. कार्यकर्ते आणि नागरिकांचीही हीच इच्छा होती. महाराष्ट्राच्या विकासासाठी हे एकत्र येणे राज्याच्या हिताचे आहे,” असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आल्याने पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात नवे समीकरण तयार झाले असून, महाविकास आघाडीसाठी हा राजकीयदृष्ट्या मोठा धक्का मानला जात आहे. पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.

Spread the love