March 23, 2026

unfilteredtruth

unfilteredtruth

एक वर्ष उलटूनही उद्घाटन नाही; सावित्रीबाई फुले विद्यापीठातील शिल्पांवर प्रश्नचिन्ह

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरातील 28 शिल्पे एक वर्षानंतरही उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहेत. जयंती दिनीही उद्घाटन न झाल्याने विद्यार्थी संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे

पुणे :
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोर उभारण्यात आलेली क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यावर आधारित शिल्पमालिका अद्याप उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. विशेष म्हणजे, सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या दिवशीही या शिल्पांचे उद्घाटन होऊ न शकल्याने विद्यार्थी संघटनांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

विद्यापीठाला सावित्रीबाई फुले यांचे नाव देण्यात आल्यानंतर त्यांच्या स्मृती जपण्यासाठी मुख्य इमारतीसमोरील परिसरात पूर्णाकृती पुतळ्यासह एकूण 28 शिल्पे उभारण्यात आली आहेत. या शिल्पांमधून सावित्रीबाई फुले यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि क्रांतिकारी कार्याचा जीवनपट उलगडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मात्र, ही शिल्पे उभारून एक वर्षाहून अधिक कालावधी उलटूनही उद्घाटन होऊ शकलेले नाही.

विद्यापीठ प्रशासनाकडून या शिल्पांचे उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते व्हावे, यासाठी राष्ट्रपती कार्यालयाशी पत्रव्यवहार करण्यात आला होता. तथापि, विविध कारणांमुळे उद्घाटनाचा कार्यक्रम अद्याप निश्चित होऊ शकलेला नाही.

सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विद्यापीठात विविध शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असले, तरी शिल्प उद्घाटन रखडल्याने अनेकांनी खेद व्यक्त केला आहे. दरम्यान, येत्या 10 फेब्रुवारी रोजी विद्यापीठाचा वर्धापन दिन असून, त्या निमित्ताने शिल्पांचे उद्घाटन करण्याचा विचार प्रशासन स्तरावर सुरू असल्याची माहिती आहे.

सध्या महापालिका निवडणुकांमुळे आचारसंहिता लागू असल्याने राजकीय व्यक्तींच्या हस्ते उद्घाटन करणे शक्य नसल्याचे विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे 3 जानेवारी रोजी उद्घाटन होणार नसल्याचेही सांगण्यात आले.

Spread the love