September 13, 2026

unfilteredtruth

unfilteredtruth

राज्यात बंदी असतानाही हुक्का उत्पादन; एफडीएच्या कारवाईत ३२ कोटींचा मुद्देमाल जप्त

महाराष्ट्रात अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई करत पुणे व ठाणे जिल्ह्यातून तब्बल ३२ कोटी रुपयांचा प्रतिबंधित हुक्का व सुगंधित तंबाखू साठा जप्त केला आहे.

मुंबई | प्रतिनिधी

महाराष्ट्रात प्रतिबंधित सुगंधित तंबाखू आणि हुक्का उत्पादनांवर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठ्या प्रमाणावर कारवाई सुरू केली असून, पुणे जिल्ह्यातील छाप्यात तब्बल ३१ कोटी ६७ लाख रुपयांचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त करण्यात आला आहे. ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथील आधीच्या कारवाईचा तपास पुढे नेत ही मोठी साखळी उद्ध्वस्त करण्यात एफडीएला यश आले आहे.

विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिलेल्या कठोर आदेशांनंतर राज्यभर बंदी असलेल्या उत्पादनांविरोधात कारवाईला वेग आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील टाकवे येथील मे. सोएक्स इंडिया प्रा. लि. या कंपनीवर एफडीएने छापा टाकला.

🧪 तपासात निकोटिन आढळले

अन्न सुरक्षा अधिकारी अस्मिता टोणपे यांच्या तक्रारीनुसार, १ डिसेंबर २०२५ रोजी कंपनीच्या उत्पादनांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. मुंबईतील अन्न विश्लेषकांच्या अहवालात या नमुन्यांमध्ये निकोटिनचे प्रमाण आढळून आले, जे मानवी आरोग्यास घातक असल्याचे स्पष्ट झाले. हा साठा १६ जुलै २०२५ रोजी लागू झालेल्या महाराष्ट्र शासनाच्या बंदी आदेशाचे उल्लंघन करणारा होता.

💰 तब्बल ३२ कोटींचा मुद्देमाल जप्त

या कारवाईत विविध फ्लेवर्सचे तयार हुक्का प्रॉडक्ट्स, कच्चा माल आणि सुगंधी फ्लेवर्स असा ३१.६७ कोटी रुपयांचा साठा जप्त करण्यात आला असून, कंपनीच्या दारांना सील ठोकण्यात आले आहे.

या प्रकरणी अनिल कुमार चौहान (असिस्टंट मॅनेजर), असिफ फाजलानी व फैजल फाजलानी (संचालक) यांच्यासह कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता तसेच अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ अंतर्गत विविध कलमांनुसार ही कारवाई करण्यात आली आहे.

🔗 भिवंडी कारवाईचा धागा

ठाणे जिल्ह्यातील भिवंडी दापोडे परिसरात ३० डिसेंबर २०२५ रोजी करण्यात आलेल्या १९.४५ कोटी रुपयांच्या हुक्का साठा जप्तीच्या तपासातून ही मोठी साखळी समोर आली. ‘अफजल’ ब्रँडच्या हुक्का उत्पादनांमध्ये निकोटिन आढळल्याने त्या कारवाईला सुरुवात झाली होती.

⚠️ माफियांमध्ये खळबळ

या सलग कारवायांमुळे राज्यातील हुक्का आणि सुगंधित तंबाखू माफियांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अभिजित सुभाष देशमुख करत आहेत.

🗣️ मंत्री झिरवाळ यांचा कडक इशारा

“राज्यात बंदी असलेल्या सुगंधित तंबाखू आणि हुक्का उत्पादनात कोणीही सहभागी आढळल्यास त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल,” असा स्पष्ट इशारा विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिला आहे.

Spread the love

You may have missed