July 30, 2026

unfilteredtruth

unfilteredtruth

हडपसर पोलिसांची धडक कारवाई; सम्राट गार्डन सोसायटीतील घरफोडीचा २४ तासात छडा, साडेतीन लाखांचे सोन्याचे दागिने जप्त…

पुणे: पुणे शहरातील हडपसर पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या एका घरफोडीच्या गुन्ह्याचा हडपसर पोलिसांनी अवघ्या २४ तासांच्या आत यशस्वी छडा लावला आहे. सम्राट गार्डन सोसायटीत झालेल्या या चोरी प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून त्याच्याकडून ३ लाख ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.

​घटनेची पार्श्वभूमी

​दिनांक ३ जुलै २०२६ रोजी रात्री ८ वाजेपासून ते २३ जुलै २०२६ रोजी सकाळी ९:३० वाजेपर्यंतच्या कालावधीत, फिर्यादीच्या बंद फ्लॅटमध्ये अज्ञात चोराने अनधिकृतपणे प्रवेश केला. बेडरुममधील कपाटाच्या लॉकरमध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने लांबवून अज्ञात इसम पसार झाला होता. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. कलम ३०५ (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

​सीसीटीव्ही आणि बातमीदारांच्या मदतीने आरोपी जेरबंद

​गुन्ह्याची गंभीर दखल घेत वरिष्ठ पोलीस अधिकारी हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक विजय पाटील व त्यांच्या पथकाने तातडीने तपासाची चक्रे हलवली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू असतानाच, तपास पथकातील अंमलदार कुंडलिक केसकर, तुकाराम झुंजार व महावीर लोंढे यांना गुप्त बातमीदारामार्फत महत्त्वाची माहिती मिळाली.

​सदर गुन्ह्यातील आरोपी हा यश हॉस्पिटजवळ, माळवाडी, हडपसर येथे थांबल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ सापळा रचून फैजल इसरार खान (वय १८ वर्षे, रा. मु. ढकाई, पो. मगदुमपुर ढोकसहा, जि. कौशंबी, राज्य उत्तर प्रदेश) यास ताब्यात घेतले. कसून चौकशी केली असता त्यानेच हा गुन्हा केल्याची कबुली दिली.

​३.५ लाखांचे सोन्याचे दागिने हस्तगत

​आरोपीकडून पोलिसांनी एकूण २३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. यामध्ये खालीलप्रमाणे मुद्देमाल समाविष्ट आहे:

  • सोन्याची चैन: १६ ग्रॅम
  • सोन्याची चैन: ६ ग्रॅम
  • सोन्याची रिंग: १ ग्रॅम
  • एकूण किंमत: ३,५०,०००/- रुपये

​सध्या आरोपीकडून पुढील कसून चौकशी सुरू असून या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक विजय पाटील करीत आहेत.

​यशस्वी कामगिरी करणारे पथक

​सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस परिमंडळ ६ चे पोलीस उप-आयुक्त श्री. जीवन बेनिवाल, हडपसर विभागाचे सहायक पोलीस आयुक्त श्री. अतुलकुमार नवगिरे, हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. हेमंत पाटील आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. निलेश जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक विजय पाटील, पोलीस अंमलदार दीपक कांबळे, निलेश किरवे, भाऊसाहेब कटके, विजय कानेकर, अजित मदने, कुंडलिक केसकर, भगवान हंबर्डे, अनिरुद्ध सोनवणे, महेश चव्हाण, तुकाराम झुंजार, आकाश धावडे, धीरज शेलार, महावीर लोंढे व कृष्णा घोळवे यांनी सहभाग घेतला होता.

Spread the love