
लोणी काळभोर (प्रतिनिधी: प्रीतम सावंत) : पुणे जिल्ह्यातील लोणी काळभोर (ता. हवेली) येथे शनिवारी (१८ जुलै) रात्री जुन्या वादातून दोन गट आमनेसामने आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. येथील प्रसिद्ध तोरणा खानावळीसमोर हा प्रकार घडला असून, दोन्ही गटांनी सार्वजनिक रस्त्यावरच एकमेकांना शिवीगाळ करत जोरदार आरडाओरडा आणि झोंबाझोंबी केली. या गोंधळामुळे परिसरात काही काळ प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते आणि स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.
या प्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी वेळेत हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली असून ११ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
यांच्यावर झाला गुन्हा दाखल:
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये खालील व्यक्तींचा समावेश आहे:
- आळंदी म्हातोबा (ता. हवेली) येथील रहिवासी: सुरज शांताराम भोंडवे (वय २४), लक्ष्मण गजानन भोंडवे (वय २४), प्रथमेश संदिप भोंडवे (वय २४), ओंकार भोंडवे (वय १९), बबन भोंडवे (वय ५०).
- लोणी काळभोर येथील रहिवासी: शुभम तावणे (वय ३०), संग्राम काळभोर (वय ३०), प्रथमेश गायकवाड (वय २५), ओंकार गायकवाड (वय २१).
- थेऊर गाव येथील रहिवासी: अमित वाघमारे (वय २५), अक्षय कांबळे (वय ३२).
याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई किरण गायकवाड यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे.
संवाद फिस्कटला अन् राडा झाला!
शनिवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास पोलीस शिपाई किरण गायकवाड आणि त्यांचे सहकारी पोलीस शिपाई मेमाणे हे थेऊर फाटा परिसरात बीट मार्शल ड्युटीवर गस्त घालत होते. यावेळी त्यांना लोणी कॉर्नर येथील तोरणा खानावळीसमोर मोठी गर्दी जमल्याचे दिसले. संशय आल्याने पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असता दोन गटातील १० ते १२ जण भररस्त्यात एकमेकांना शिवीगाळ करत झोंबाझोंबी करत असल्याचे आढळून आले.
परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता लक्षात घेऊन बीट मार्शलने रात्रगस्त अधिकारी पोलीस उपनिरीक्षक योगेश पैठणे यांना तात्काळ माहिती दिली. त्यांच्या सूचनेनुसार अतिरिक्त पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी दोन्ही गटांना वेगळे करून परिस्थिती नियंत्रणात आणली.
प्राथमिक चौकशीत समोर आले आहे की, हे दोन्ही गट त्यांच्यातील जुना वाद मिटवण्यासाठी एकत्र आले होते. मात्र, बोलणी सुरू असतानाच वाद पुन्हा उफाळला आणि त्याचे रूपांतर सार्वजनिक ठिकाणी गोंधळ व हाणामारीत झाले. या प्रकरणी सर्व ११ आरोपींवर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४(२) अंतर्गत सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला असून लोणी काळभोर पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

More Stories
पुणे : सामाजिक कार्यकर्त्या स्मिता नॉर्टन यांचे निधन; महिला व वंचितांच्या प्रश्नांसाठी कायम राहिल्या पुढे…
पुणे: कर्जाचा डोंगर अन् शेतातील नुकसान; MPSC ची तयारी करणाऱ्या तरुणाची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये व्यथा उघड…
पुणे: लोणी काळभोर पोलीस ठाण्यात एसीबीचा छापा; लाचखोर सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर रंगेहाथ जाळ्यात…