July 29, 2026

unfilteredtruth

unfilteredtruth

​पुणे: ऑनलाईन ट्रेडिंगच्या नादापायी राहत्या सोसायटीतच घरफोडी; १९ वर्षांचा तरुण कोंढवा पोलिसांच्या जाळ्यात…

पुणे: ऑनलाईन ट्रेडिंगमध्ये पैसे कमावण्याच्या किंवा गमावलेले पैसे वसूल करण्याच्या मोहापायी एका १९ वर्षांच्या तरुणाने आपल्याच सोसायटीत घरफोडी केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. कोंढवा बुद्रुक येथील ‘कमल प्रभा अपार्टमेंट’मध्ये घडलेल्या या गुन्ह्याचा छडा लावत कोंढवा बुद्रुक-येवलेवाडी पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने आरोपीला २४ तासांत जेरबंद केले आहे. त्याच्याकडून ७० हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.

वॉचमनकडे ठेवलेल्या चावीचा गैरफायदा

​कमल प्रभा अपार्टमेंट सोसायटीत राहणारे फिर्यादी काही कामानिमित्त बाहेर गेले होते. जाताना त्यांनी त्यांच्या फ्लॅटची चावी सोसायटीच्या वॉचमनकडे विश्वासाने ठेवली होती. याच गोष्टीचा गैरफायदा घेत अज्ञात चोराने वॉचमनच्या ड्राव्हरमधून चावी चोरली आणि फिर्यादींचा फ्लॅट उघडून कपाटातील ७०,०००/- रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि चांदीचे कॉइन्स लांबवले. याप्रकरणी कोंढवा बुद्रुक येवलेवाडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३३१ (३) आणि ३०५ अन्वये गुन्हा (गु.र.नं. १०२/२०२६) दाखल करण्यात आला होता.

चोराची हुशारी ठरली अपुरी; सीसीटीव्हीवर लावला होता चिखल

​गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांना समजले की, चोराने ओळख लपवण्यासाठी प्रथम सोसायटीचे मुख्य सीसीटीव्ही (CCTV) कॅमेरे बंद केले होते. एवढेच नव्हे तर, फिर्यादींच्या फ्लॅटच्या बाहेर लावलेल्या कॅमेऱ्यावर चिखल फासला होता. यामुळे हा गुन्हा सोसायटीतीलच किंवा सर्व माहिती असलेल्या व्यक्तीने केल्याचा संशय पोलिसांना आला.

​तपास पथकातील पोलीस अंमलदार गणेश चिंचकर, सुजित मदन आणि मयुर मोरे यांनी तांत्रिक कौशल्याचा वापर करून सीसीटीव्ही बंद होण्यापूर्वीचा डेटा तपासला. त्यामध्ये सोसायटीत राहणारा प्रतिक राजेंद्र शर्मा (वय १९ वर्षे) हा वॉचमन नसताना तिथे संशयास्पद रितीने फिरताना आढळला.

पोलिसी खाक्या दाखवताच दिली कबुली:

पोलिसांनी संशयाच्या आधारे प्रतिक शर्मा याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या प्रतिकने अखेर पोलिसी खाक्या दाखवताच गुन्ह्याची कबुली दिली. ऑनलाईन ट्रेडिंगच्या मोहापायी त्याने हे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे. त्याच्याकडून चोरीचा संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक आकाश विटे पुढील तपास करत आहेत.

या पोलीस पथकाने केली कामगिरी

​सदरची यशस्वी कारवाई पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ-५) श्रीमती राजलक्ष्मी शिवणकर आणि सहा. पोलीस आयुक्त (वानवडी विभाग) श्री. राम इंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

​कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मारुती पाटील व पोलीस निरीक्षक (गुन्हे) दीपक कारंडे यांच्या सूचनेनुसार तपास पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक आकाश विटे, पोलीस अंमलदार अभिजित जाधव, अभिजित रत्नपारखी, गणेश चिंचकर, विजय खेंगरे, अनिल बनकर, किशोर पवार, रुपेश पाटील, लक्ष्मण होळकर, मयूर मोरे आणि सुजित मदन यांनी ही कामगिरी बजावली.

Spread the love