
पुणे : कोंढवा भागात एका नागरिकाला अडवून, त्यांच्या डोक्यात दगड मारून जबरदस्तीने पैसे चोरून पळून जाणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना कोंढवा पोलिसांनी अत्यंत शिताफीने अटक केली आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे तपास पथकाने अवघ्या काही दिवसांतच या आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.
नेमकी काय घडली होती घटना?
दिनांक २८ जून २०२६ रोजी फिर्यादी हे कोंढवा खुर्द येथील ज्योती चौकाजवळ असलेल्या मोकळ्या मैदानावरून जात होते. यावेळी दोन अनोळखी इसमांनी त्यांना रस्त्यात अडवले आणि शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यातील एका आरोपीने फिर्यादींना जोराचा धक्का देऊन खाली पाडले आणि त्यांच्या पाठीमागील खिशातील पाकीट काढून घेण्याचा प्रयत्न केला.
फिर्यादींनी तात्काळ आरडाओरड करत प्रतिकार केला असता, दुसऱ्या आरोपीने त्यांच्या डोक्यात थेट दगड मारून गंभीर दुखापत केली. त्यानंतर आरोपींनी पाकिटातील ४,७०० रुपयांची रोख रक्कम जबरदस्तीने काढून घेतली आणि घटनास्थळावरून पोबारा केला. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०९(६) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सीसीटीव्ही फुटेज ठरले महत्त्वाचे
गुन्हा दाखल झाल्यानंतर कोंढवा पोलीस स्टेशनचे तपास पथक तात्काळ ॲक्शन मोडमध्ये आले. तपास पथकातील पोलीस अंमलदार राहुल शेलार, पुष्पेंद्र चव्हाण आणि शाहिद रजपुत यांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची कसून तपासणी केली. फुटेजमध्ये मिळालेल्या क्लूच्या आधारे संशयित आरोपी हे शिवनेरीनगर (गल्ली नं. १४), कोंढवा खुर्द येथे असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तात्काळ सापळा रचून त्या दोन संशयितांना ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेले आरोपी:
१) फरान वसीम शेख (वय २१ वर्षे, रा. भगवा चौक, कोंढवा, पुणे)
२) फरमान अस्लम मलीक (वय १९ वर्षे, रा. गल्ली नं. ०१, भाग्योदयनगर, कोंढवा खुर्द, पुणे)
पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली असता, त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून गुन्ह्यात लुटलेली संपूर्ण रोख रक्कम हस्तगत केली आहे.
या पथकाने केली कामगिरी
सदरची यशस्वी कारवाई पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ ५) श्रीमती राजलक्ष्मी शिवणकर, सहाय्यक पोलीस आयुक्त (वानवडी विभाग) श्री. रामदास इंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली; वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संतोष खेतमाळस आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रशांत मंडले यांच्या सूचनेवरून करण्यात आली.
या कारवाईत तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक रवींद्र गावडे, पोलीस अंमलदार रवींद्र चिप्पा, मेमाने, अमोल हिरवे, राहुल शेलार, पुष्पेंद्र चव्हाण, शाहिद रजपुत, केशव हिरवे, संतोष बनसुडे, सुरज शुक्ला, अमित सूर्यवंशी, रियाज पटेल, रशिद शेख आणि ओंकार शेटे यांनी मोलाची भूमिका बजावली.

More Stories
पुण्यात खळबळ! विक्रीसाठी आणलेली ४ गावठी पिस्टल जप्त; खंडणी विरोधी पथकाची धडक कारवाई, एक जण जेरबंद…
पुणे ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई: दौंड तालुक्यातील खुटबाव येथे दरोड्याच्या तयारीत असलेले आंतरजिल्हा दरोडेखोर जेरबंद…
दौंड तालुक्यातील दापोडी येथे बेकायदेशीर गावठी हातभट्टी दारूवर पोलिसांची कारवाई; एकावर गुन्हा दाखल…