July 29, 2026

unfilteredtruth

unfilteredtruth

पुणे: प्रतिबंधित ई-सिगारेट आणि हुक्का फ्लेवरची ऑनलाईन विक्री करणाऱ्या दोघांना विमानतळ पोलिसांनी केले जेरबंद; १.४२ लाखांचा मुद्देमाल जप्त…

पुणे, १ जुलै २०२६: पुण्यातील विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत ऑनलाईन पद्धतीने बेकायदेशीरपणे प्रतिबंधित ई-सिगारेट आणि हुक्का फ्लेवरची विक्री करणाऱ्या रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी एकूण १,४२,६९० रुपये किमतीचे प्रतिबंधित साहित्य जप्त केले असून दोघांना अटक केली आहे.

बनावट ग्राहकाद्वारे रचला सापळा

विमानतळ पोलीस स्टेशनच्या हद्दीत ऑनलाईन माध्यमांतून बेकायदेशीर हुक्का फ्लेवर आणि ई-सिगारेट विकली जात असल्याची खात्रीशीर माहिती पोलीस अंमलदार हरीप्रसाद पुंडे यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे तपास पथकाने ३० जून २०२६ रोजी एका बनावट ग्राहकामार्फत ऑनलाईन हुक्का फ्लेवरची ऑर्डर दिली.
त्यानंतर विमाननगर येथील सीसीडी चौक, कोनार्कनगर सोसायटीजवळ सापळा रचण्यात आला. या ठिकाणी ऑर्डर घेऊन आलेल्या ‘पोर्टर’ (Porter) डिलिव्हरी बॉयला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्या जवळील पार्सलची झडती घेतली असता, त्यात १८,३२० रुपये किमतीचे प्रतिबंधित हुक्का फ्लेवर आढळून आले.

मुख्य दुकानावर छापा आणि अटक

डिलिव्हरी बॉयकडे कसून चौकशी केल्यानंतर त्याने हे पार्सल मोहम्मदवाडी येथील एका दुकानातून आणल्याचे सांगितले. या माहितीवरून विमानतळ पोलीस स्टेशनचे तपास पथक प्रभारी अधिकारी पोलीस उप-निरीक्षक नितीन राठोड आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी मोहम्मदवाडी, एनआयबीएम रोडवरील एचडीएफसी बँकेजवळ असलेल्या ‘शिशा कॉर्नर’ (Shops No. 5, Hills and Dales) या दुकानावर छापा टाकला.
या छाप्यात पोलिसांनी खालील दोन आरोपींना अटक केली आहे:
१) असद चांदमिया बरभैया (वय ३१ वर्षे, रा. बैगदीनगर, कोंढवा, पुणे)
२) विकास रमेश बागुल (वय ३३ वर्षे, रा. मोहम्मदवाडी, पुणे)
दुकानाच्या झडतीमध्ये १,२४,३७० रुपये किमतीचे प्रतिबंधित हुक्का फ्लेवर, ई-सिगारेट आणि इतर संबंधित साहित्य जप्त करण्यात आले. डिलिव्हरी बॉयजवळील पार्सल आणि दुकानातील साठ्यासह पोलिसांनी एकूण १,४२,६९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

गुन्हा दाखल

अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींविरुद्ध विमानतळ पोलीस ठाण्यात गु.र.नं. ३१७/२०२६ नुसार ‘इलेक्ट्रॉनिक सिगारेट उत्पादन, आयात, निर्यात, वाहतूक, विक्री, साठवणूक आणि जाहिरात प्रतिबंध अधिनियम २०१९’ चे कलम ७ व ८, तसेच ‘सिगारेट व तंबाखूजन्य इतर उत्पादने अधिनियम २००३ व २००४’ च्या कलम ७(२) आणि २०(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस पथक

सदर धडक कारवाई अपर पोलीस आयुक्त (पूर्व प्रादेशिक विभाग) श्री. मनोज पाटील, पोलीस उपायुक्त (परिमंडळ-०७) श्री. अबिनाश कुमार आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (खराडी विभाग) श्री. सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक (विमानतळ) श्री. गोविंद जाधव, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. महेश बोलके यांच्या सूचनेनुसार पोलीस उप-निरीक्षक नितीन राठोड, पोलीस अंमलदार हरीप्रसाद पुंडे, लालू कन्हे, राहुल जोशी, रुपेश पिसाळ, योगेश थोपटे, सचिन मांजरे, अंबादास चव्हाण, दिगंबर गोरे, राजीव टोंम्पे, प्रशांत सुतार, अंकुश जोगदंडे, आशा धादवड आणि सना शेख यांच्या पथकाने ही यशस्वी कामगिरी बजावली.

Spread the love