
पुणे, लोणी काळभोर (प्रतिनिधी: प्रीतम सावंत): लोणी रेल्वे स्टेशन परिसरात बेकायदेशीररीत्या अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या एका तस्कराला लोणी काळभोर पोलिसांनी रंगेहात पकडले आहे. मंगळवारी (३० जून) सायंकाळी पावणे आठ वाजण्याच्या सुमारास ही धडक कारवाई करण्यात आली. या छाप्यात पोलिसांनी आरोपीकडून ६०८ ग्रॅम गांजा आणि मोबाईल असा एकूण ४१,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
अमिरखान सुदाखान पठाण (वय ५०, रा. विश्वराज हॉस्पिटल शेजारी, लोणी स्टेशनजवळ, कदमवाकवस्ती, ता. हवेली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी पोलीस शिपाई अशोक भागवत गिरी यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
अशी झाली कारवाई:
पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, कदमवाकवस्ती येथील विश्वराज हॉस्पिटलसमोर, लोणी रेल्वे स्टेशन जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला एक इसम संशयास्पदरीत्या फिरत होता. माहितीची खातरजमा करून पोलिसांनी तातडीने त्या ठिकाणी छापा टाकला. संशयित आरोपी अमिरखान पठाण याची झडती घेतली असता, त्याच्याकडे विक्रीसाठी आणलेला ३६,००० रुपये किमतीचा ६०८ ग्रॅम गांजा आणि ५,००० रुपयांचा मोबाईल फोन आढळून आला. पोलिसांनी हा सर्व मुद्देमाल जागीच जप्त केला.
एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल:
अमली पदार्थांची बेकायदेशीर वाहतूक आणि विक्री केल्याप्रकरणी आरोपी अमिरखान पठाण याच्याविरुद्ध लोणी काळभोर पोलीस ठाण्यात एनडीपीएस (NDPS) कायद्याच्या कलम ८(क) आणि २०(ब)(ii)(अ) अन्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.
सदर कारवाई लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिगंबर सोनटक्के करत आहेत.

More Stories
पुणे विद्यापीठात डिग्रीचा बाजार? ३ लाखांत मिळतेय B.Com ची बनावट पदवी; रिक्षाचालकाच्या सतर्कतेमुळे खळबळ…
दिल्लीतील जंतरमंतर लाठीहल्ल्याच्या निषेधात लोणी काळभोर येथे भव्य मोर्चा संपन्न; सर्वपक्षीय कार्यकर्ते व नागरिकांचा सहभाग…
पुणे: कोंढव्यात ई-सिगारेट (वेब) विक्री करणाऱ्यावर पोलिसांची धडक कारवाई; ४५ हजारांचा माल जप्त…