
पुणे : पुणे महापालिकेत ‘टक्केवारी’च्या मुद्द्यावरून भाजपच्या आजी-माजी नगरसेविकांमध्ये राडा झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकाराची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली असून, सत्ताधारी भाजपच्या गोटातच या वादामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
बाणेर येथील आदिवासी विद्यार्थिनींसाठी उभारण्यात येणाऱ्या निवासी शिक्षण केंद्राच्या कामावरून हा वाद निर्माण झाला. महापालिकेमार्फत राबविण्यात येणाऱ्या या प्रकल्पाचे सुमारे ८५ ते ९० टक्के काम पूर्ण झाले असून, उर्वरित कामासाठी सुमारे ३ कोटी रुपयांचे टेंडर काढण्यात आले आहे. या टेंडरला स्थायी समितीची मंजुरीही मिळाली आहे. मात्र, अंतिम टप्प्यात ‘टक्केवारी’च्या मुद्द्यावरून वातावरण तापल्याचे समोर आले आहे.
या प्रकल्पासाठी सुरुवातीपासून पाठपुरावा करणाऱ्या माजी नगरसेविका राजश्री काळे बुधवारी महापालिकेच्या भवन विभागात आल्या असता, तेथे विद्यमान नगरसेविका रोहिणी चिमटे आणि संबंधित कंत्राटदार उपस्थित होते. यावेळी कामाच्या अंमलबजावणीवरून दोघींमध्ये जोरदार वादावादी झाली. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असताना वाद अधिकच चिघळला आणि शिवीगाळ तसेच गोंधळ झाल्याचा प्रकार घडला.
दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर महापालिका वर्तुळात खळबळ उडाली असून, सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
माजी नगरसेविका राजश्री काळे यांनी आरोप केला की, “हा प्रकल्प अंतिम टप्प्यात असून आदिवासी विद्यार्थिनींसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. मात्र ‘टक्केवारी’च्या कारणावरून कामात अडथळा आणला जात आहे. नगरसेविका रोहिणी चिमटे यांनी कंत्राटदाराला टक्केवारी मिळेपर्यंत काम सुरू करू नका, अशी धमकी दिली. स्थायी समिती सदस्य असल्याचा धाक दाखवत काम रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला.”
दुसरीकडे, नगरसेविका रोहिणी चिमटे यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांनी स्पष्ट केले की, “केंद्राच्या सीमाभिंतीचे काम अद्याप अपूर्ण आहे. त्यामुळे शेजारील नागरिकांना त्रास होत आहे. ते काम आधी पूर्ण करण्यास सांगितले होते. त्यावरून गैरसमज झाला.”

More Stories
दौंड तालुक्यात शाळकरी मुलींचा पाठलाग करून विनयभंग; यवत पोलिसांची मोठी कारवाई, दोन आरोपींना अटक…
पुण्यात खळबळ! विक्रीसाठी आणलेली ४ गावठी पिस्टल जप्त; खंडणी विरोधी पथकाची धडक कारवाई, एक जण जेरबंद…
पुणे ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई: दौंड तालुक्यातील खुटबाव येथे दरोड्याच्या तयारीत असलेले आंतरजिल्हा दरोडेखोर जेरबंद…