
नाशिक : पवनपुत्र हनुमानाचे जन्मस्थळ मानल्या जाणाऱ्या अंजनेरी (ता. त्र्यंबकेश्वर) पर्वतावर भाविकांसाठी मोठी सुविधा उपलब्ध होणार आहे. अंजनेरी ते पेगलवाडी दरम्यान रोपवे उभारण्याचा मार्ग मोकळा झाला असून, जिल्हा प्रशासनाने भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण केली आहे. येत्या सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी हा प्रकल्प पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
या प्रकल्पामुळे अंजनेरी डोंगरावर चढण्यासाठी लागणारी कसरत मोठ्या प्रमाणात कमी होणार असून, भाविकांना सहज आणि सुरक्षितपणे दर्शन घेता येणार आहे. सध्या या ठिकाणी जाण्यासाठी मोठा डोंगर चढावा लागतो, त्यामुळे वृद्ध आणि लहान मुलांसाठी अडचणी निर्माण होतात.
नाशिकपासून सुमारे २२ किलोमीटर अंतरावर असलेला अंजनेरी परिसर नैसर्गिक सौंदर्य आणि धार्मिक महत्त्वामुळे प्रसिद्ध आहे. त्र्यंबकेश्वर पर्वतरांगांमध्ये वसलेल्या या टेकडीला तीन शिखरे असल्याने ‘त्रिकूट’ असेही म्हटले जाते. येथे अंजनीदेवीचे मंदिर असून, त्यावरूनच ‘अंजनेरी’ हे नाव प्रचलित झाल्याची आख्यायिका सांगितली जाते.
सुमारे १३०० मीटर उंचीवर असलेल्या या परिसरात जैवविविधतेचेही मोठे महत्त्व आहे. अंजनेरी पर्वतावर विविध दुर्मीळ वनस्पती आढळतात. ‘सेरोपेजिया अंजनेरिका’ ही वनस्पती विशेषतः या भागातच आढळणारी असल्याने या परिसराचे पर्यावरणीय महत्त्वही अधोरेखित होते.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी अपेक्षित आहे. त्या अनुषंगाने अंजनेरीला रोपवेने जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, जेणेकरून भाविकांना सोयीस्करपणे हनुमानाचे दर्शन घेता येईल.
दरम्यान, परिसरातील धार्मिक स्थळांच्या विकासालाही गती देण्यात येत आहे. टाकळी येथील मारुती मंदिर परिसरात करण्यात आलेल्या सुशोभीकरणामुळे भक्तांसाठी आकर्षक आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. येथे विविध धार्मिक उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात.
या प्रकल्पामुळे अंजनेरीचा धार्मिक आणि पर्यटनदृष्ट्या विकास होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

More Stories
पुणे : सामाजिक कार्यकर्त्या स्मिता नॉर्टन यांचे निधन; महिला व वंचितांच्या प्रश्नांसाठी कायम राहिल्या पुढे…
पुणे: कर्जाचा डोंगर अन् शेतातील नुकसान; MPSC ची तयारी करणाऱ्या तरुणाची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये व्यथा उघड…
कोथरुड पोलिसांची धडक कारवाई: १ लाखांचे बक्षीस असलेला १ वर्षापासून फरार मोक्कातील आरोपी आंदेशे गावातून अटक….