अजित पवारांच्या वक्तव्यानंतर भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये पुन्हा तणाव वाढला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत अजितदादांना सूचक इशारा दिला.

पुणे | राज्यातील पुणे, पिंपरी-चिंचवडसह अनेक महापालिकांमध्ये महायुतीत अंतर्गत मतभेद उघड होत असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या एका वक्तव्यानंतर भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये नव्या वादाला तोंड फुटले आहे. या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी अजित पवार यांच्यावर सूचक पण ठाम पलटवार केला आहे.
अजित पवार यांनी नुकतेच “माझ्यावर 70 हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते, पण ते सिद्ध झाले का?” असा सवाल करत, आरोप करणारेच आज माझ्यासोबत सत्तेत आहेत, असा टोला लगावला होता. याचबरोबर पुण्यात भाजपने कोट्यवधी रुपयांच्या ठेवी मोडल्याचा आरोप करत त्यांनी स्थानिक भाजप नेत्यांवर भ्रष्टाचाराचा निशाणा साधला होता.
या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना रवींद्र चव्हाण यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत भाजपची भूमिका स्पष्ट केली. “खुद के गिरेबान में झाँक के देखिए. आम्ही जर सविस्तर बोलायला लागलो, तर अजितदादांना अडचण होईल,” असा थेट इशारा त्यांनी दिला. तसेच, “आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारमध्ये काम करत आहात, हे नाकारता येईल का?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
विकासाच्या मुद्द्यावर भाजप आक्रमक
पत्रकार परिषदेत रवींद्र चव्हाण यांनी भाजप सरकारच्या विकासकामांचा आढावा घेतला. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रातील एनडीए सरकार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्यातील महायुती सरकार विकासाचे मॉडेल उभे करत असल्याचे त्यांनी सांगितले.
कोरोनामुळे लांबलेल्या निवडणुकांनंतर आता महापालिका निवडणुका होत असून, गेल्या काही वर्षांत पुण्यात पायाभूत सुविधांना गती देण्यात आली आहे. मेट्रो, रस्ते, सार्वजनिक वाहतूक आणि इलेक्ट्रिक बस यांसारख्या प्रकल्पांमुळे शहराच्या विकासाला दिशा मिळाली असल्याचा दावा चव्हाण यांनी केला.
मेट्रोवरून महाविकास आघाडीवर टीका
पुणे मेट्रोचा ठराव महापालिकेत मंजूर झाल्यानंतरही, केंद्र व राज्यात सत्ता असताना महाविकास आघाडी सरकारला मेट्रो सुरू करता आली नाही, असा आरोपही त्यांनी केला. “मोदी सरकार आल्यानंतरच मेट्रो प्रत्यक्षात सुरू झाली असून, सध्या 33 किलोमीटरचे जाळे कार्यरत आहे. येत्या काळात संपूर्ण पुण्यात मेट्रोचे जाळे विस्तारले जाईल,” असे त्यांनी स्पष्ट केले.
एकूणच, अजित पवारांच्या वक्तव्यानंतर भाजप-राष्ट्रवादीतील अंतर्गत तणाव पुन्हा एकदा उघड झाला असून, आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण अधिक तापण्याची चिन्हे दिसत आहेत.

More Stories
पुणे विद्यापीठात डिग्रीचा बाजार? ३ लाखांत मिळतेय B.Com ची बनावट पदवी; रिक्षाचालकाच्या सतर्कतेमुळे खळबळ…
दिल्लीतील जंतरमंतर लाठीहल्ल्याच्या निषेधात लोणी काळभोर येथे भव्य मोर्चा संपन्न; सर्वपक्षीय कार्यकर्ते व नागरिकांचा सहभाग…
पुणे: कोंढव्यात ई-सिगारेट (वेब) विक्री करणाऱ्यावर पोलिसांची धडक कारवाई; ४५ हजारांचा माल जप्त…