July 29, 2026

unfilteredtruth

unfilteredtruth

चिमुकलीला अखेर न्याय! पुण्याच्या विशेष न्यायालयाचे कडक ताशेरे; नराधम भीमराव कांबळेला फाशी…

पुणे:

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे उन्हाळ्याच्या सुट्टीत आजीकडे आलेल्या साडेतीन वर्षांच्या निष्पाप चिमुरडीवर अत्याचार करून तिचा निर्घृण खून करणाऱ्या ६५ वर्षीय नराधम भीमराव प्रभाकर कांबळेला पुणे सत्र न्यायालयाने आज मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने हे प्रकरण ‘दुर्मिळातील दुर्मिळ’ (Rarest of Rare Case) मानत हा ऐतिहासिक निर्णय दिला.

अवघ्या ५८ दिवसांत चिमुकलीला न्याय

१ मे २०२६ रोजी ही काळीज हेलावून टाकणारी घटना घडली होती. या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती. पुणे ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून अवघ्या १५ दिवसांत १,२०० पानांचे दोषारोपपत्र (Chargesheet) न्यायालयात दाखल केले होते. फास्ट ट्रॅक कोर्टात दररोज या खटल्याची सुनावणी झाली आणि अवघ्या दोन महिन्यांच्या आत म्हणजेच ५८ दिवसांत यावर अंतिम शिक्कामोर्तब झाले.

न्यायालयाचे तीव्र ताशेरे आणि निरीक्षण

विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी न्यायालयात आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची जोरदार मागणी केली. त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या १२ विविध निकालांचे दाखले देत स्पष्ट केले की, आरोपीने अत्यंत शांत डोक्याने, क्रूरपणे आणि असहाय्य बालकावर हे कृत्य केले आहे.

​निकाल वाचताना विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी निरीक्षण नोंदवले की, “आरोपीला वयाच्या व्यतिरिक्त कोणतीही माफी देण्यालायक परिस्थिती नाही. आरोपीचा पूर्वइतिहासही गंभीर स्वरूपाचा आहे. स्वतःची अमानवी वासना पूर्ण करण्यासाठी त्याने हे घृणास्पद कृत्य केले असून, त्याच्या चेहऱ्यावर पश्चात्तापाची कोणतीही भावना नाही. अशा नराधमाला जन्मठेपेची शिक्षाही अपुरी आहे.”

​या खटल्यात पोलिसांनी मजबूत परिस्थितीजन्य पुरावे, सीसीटीव्ही फुटेज आणि डीएनए (DNA) रिपोर्ट न्यायालयासमोर सादर केले, जे न्यायालयाने ग्राह्य धरले. या जलद न्यायप्रक्रियेचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून पीडित कुटुंबाला अखेर न्याय मिळाला आहे.

Spread the love