
पुणे उरुळी कांचन (प्रतिनिधी: प्रीतम सावंत): नातेवाईकांकडील नवीन घराच्या पूजेच्या कार्यक्रमासाठी गेलेल्या एका रिक्षाचालकाच्या घरात अज्ञात चोरट्याने डल्ला मारल्याची घटना समोर आली आहे. चोरट्याने घराच्या खिडकीचे लोखंडी गज वाकवून आत प्रवेश केला आणि कपाटातील सुमारे ७२ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना हवेली तालुक्यातील नायगाव येथील मार्गवस्ती परिसरात घडली.
याप्रकरणी रेश्मा अल्लाउद्दीन कायमे (वय ३९, रा. मार्गवस्ती, शिवरोड, नायगाव, ता. हवेली) यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कार्यक्रमाला गेले अन् मागे घरफोडी झाली
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रेश्मा कायमे या आपल्या पती, मुलगा आणि मुलीसह नायगाव येथे राहतात. त्यांचे पती अल्लाउद्दीन हे रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. रविवारी (दि. २८) दुपारी अडीच वाजेच्या सुमारास कुंजीरवाडी येथे राहणारे त्यांचे नातेवाईक जावेद अन्सारी यांच्या नवीन घराची पूजा असल्याने कायमे कुटुंब तिकडे गेले होते.
रात्री अकरा वाजेच्या सुमारास कार्यक्रम आटोपून ते घरी परतले. त्यांनी मुख्य दरवाजाचे कुलूप उघडून आत प्रवेश केला असता, घरातील कपाटाचे दार उघडे दिसले आणि सामान अस्ताव्यस्त पडलेले होते. रेश्मा यांनी कपाटात तपासले असता, त्यांचे आणि त्यांच्या मुलीचे सोन्याचे दागिने गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
खिडकीचे गज वाकवून केला प्रवेश
घराची पाहणी केली असता, पत्राच्या शेडला हवेसाठी ठेवलेल्या खिडकीच्या जाळीचे लोखंडी गज चोरट्याने वाकवल्याचे दिसून आले. याच वाकवलेल्या गजांच्या फटीतून चोरट्याने घरात प्रवेश करून चोरी केल्याचे स्पष्ट झाले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पुढील तपास पोलीस हवालदार सचिन जगताप करत आहेत.

More Stories
पुणे : सामाजिक कार्यकर्त्या स्मिता नॉर्टन यांचे निधन; महिला व वंचितांच्या प्रश्नांसाठी कायम राहिल्या पुढे…
पुणे: कर्जाचा डोंगर अन् शेतातील नुकसान; MPSC ची तयारी करणाऱ्या तरुणाची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये व्यथा उघड…
पुणे: लोणी काळभोर पोलीस ठाण्यात एसीबीचा छापा; लाचखोर सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर रंगेहाथ जाळ्यात…