
पुणे, दि. २७ जून: पुणे शहर गुन्हे शाखेच्या युनिट-२ पथकाने अंबेगाव पठार परिसरात कारवाई करत एका आरोपीकडून एक पिस्तूल व चार जिवंत काडतुसे असा सुमारे ४०,८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ जून रोजी युनिट-२चे पोलिस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर दळवी व त्यांचे पथक परिसरात गस्त घालत असताना पोलिस अंमलदार शिवानंद कायगुडे व उज्ज्वल मोकाशी यांना गुप्त माहिती मिळाली. अंबेगाव पठार येथील शिवकॉलनी परिसरात एक व्यक्ती बेकायदेशीररीत्या अग्निशस्त्र बाळगून थांबलेली असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक राहुल खिलारे यांना देण्यात आली.
त्यानुसार पोलिसांनी तात्काळ सापळा रचून दिनेश सुरेश दोरे (वय ३८, रा. शिवकॉलनी, अंबेगाव पठार, पुणे) याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून एक पिस्तूल व चार जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली.
या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३५०/२०२६ नुसार शस्त्र अधिनियम कलम ३(२५) तसेच महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई अपर पोलिस आयुक्त (गुन्हे) तेजस्वी सातपुते, पोलिस उपायुक्त (गुन्हे) गौहर हसन आणि सहाय्यक पोलिस आयुक्त शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक राहुल खिलारे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर दळवी व युनिट-२च्या पथकाने केली.

More Stories
पुणे विद्यापीठात डिग्रीचा बाजार? ३ लाखांत मिळतेय B.Com ची बनावट पदवी; रिक्षाचालकाच्या सतर्कतेमुळे खळबळ…
दिल्लीतील जंतरमंतर लाठीहल्ल्याच्या निषेधात लोणी काळभोर येथे भव्य मोर्चा संपन्न; सर्वपक्षीय कार्यकर्ते व नागरिकांचा सहभाग…
पुणे: कोंढव्यात ई-सिगारेट (वेब) विक्री करणाऱ्यावर पोलिसांची धडक कारवाई; ४५ हजारांचा माल जप्त…